चॉकलेट गिळल्यामुळे सात महिन्यांची मुलगी दगावली (File Photo)
बीड : बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली. एका ७ महिन्यांच्या चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकले आणि त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मुलीच्या घशात चॉकलेट अडकल्यानंतर या चिमुकलीचा मृतदेह कुशीत घेऊन नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालय गाठले. मात्र, उपचारापूर्वीच या घटनेत चिमुकलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
बीड तालुक्यातील काटवटवाडी गावातील या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आरोही आनंद खोड असे मृत मुलीचे नाव असून, ती अवघ्या सात महिन्यांची होती. घरातच खेळत असताना खाली पडलेले चॉकलेट तिने तोंडात टाकून गिळण्याचा प्रयत्न केला. अचानक चॉकलेट घशात अडकल्याने तिला श्वास घेणेही कठीण झाले. काही क्षणातच तिची प्रकृती गंभीर बनली. कुटुंबीयांनी घाईघाईने तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. परंतु तोपर्यंत तिच्यावर कोणतेही उपाय होण्यापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, बीडमध्ये दोन दिवसांपूर्वी एकाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता, त्यानंतर त्या व्यक्तीच्या तीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बीड जवळील इमामपूर रोड परिसरात या तीन वर्षीय चिमुकलीला गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. दोन दिवसांपूर्वीच याच मुलीच्या वडिलांचा मृतदेह इमामपूर रोड परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
दहा वर्षांच्या बाळाचा मृत्यू
दुसऱ्या एका घनटेत, काही महिन्यांपूर्वीच, शेजारच्या बाळासोबत खेळायला गेलेल्या एका दहा वर्षीय बालकाचा पाळण्याच्या दोरीचा गळफास लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. नमन नितीन निंभोरकर (वय 10, रा. चिचफैल लाईन नं. 2. रुख्मिमीनगराजवळ) असे मृत बालकाचे नाव आहे. दोरीच्या पाळण्याने गळफास लागल्याची ही घटना राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. त्यानंतर या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.