फोटो सौजन्य - Social Media
वाळूज येथील बजाजनगर परिसरातील शिवछत्रपती विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ १ फेब्रुवारी रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी ‘कॉपीमुक्त अभियान’ अंतर्गत “आम्ही कॉपी करणार नाही” अशी ठाम प्रतिज्ञा घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रामाणिकपणा, शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण होत असल्याचे दिसून आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या अध्यक्षा तथा मुख्याध्यापिका विद्या भोसले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कवी व लेखक संतोष विरकर तसेच संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी दहावीतील विद्यार्थी रोहित इंगळे, गौरव शेळके, अधर्व भगत, प्राप्ती पवार, सृष्टी देशमुख आणि ऋतुजा सुरमवाड यांनी शाळा, मुख्याध्यापिका आणि शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आपल्या भावना मांडल्या. शालेय जीवनातील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रमैत्रिणींचा सहवास यामुळे आपला शैक्षणिक प्रवास घडल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे संतोष विरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना थोर पुरुष आणि यशस्वी व्यक्तींची उदाहरणे दिली. यश हे कोणत्याही शॉर्टकटने नव्हे, तर परिश्रम, जिद्द आणि प्रामाणिकपणानेच मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले. परीक्षांमध्ये कॉपी करण्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका विद्या भोसले यांनी विद्यार्थ्यांना शिस्त, आचार, विचार आणि संस्कार यांचे महत्त्व पटवून दिले. “शालेय जीवनात रुजलेले संस्कारच पुढील आयुष्यात विद्यार्थ्यांना योग्य दिशा देतात. आजचा विद्यार्थी हा उद्याचा जागरूक नागरिक असून देशाचा आधारस्तंभ आहे,” असे त्या म्हणाल्या. यानंतर शिक्षक नागेश कदम, अमोल चव्हाण, गणेश लोंढे, सारिका डोंगरे आणि निकिता ताटे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका विद्या भोसले व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दहावीच्या विद्यार्थ्यांना रायटिंग पॅड आणि पेनचे वाटप करण्यात आले.
यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला डिजिटल बोर्ड व व्हाईटबोर्ड भेट देत शाळेबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त केली. निरोप घेताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. शालेय जीवन, अभ्यास, मस्ती आणि शिक्षकांचा सहवास आता पुन्हा मिळणार नाही, या भावनेने वातावरण भावूक झाले होते. या निरोप समारंभाचे आयोजन इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची मोरे आणि राजनंदिनी रुद्राक्षवार यांनी केले, तर आभार दिव्या राजपूत हिने मानले. कार्यक्रमास शिक्षकवर्ग, विद्यार्थी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.






