Parliament budget session संसदेत राडा! विरोधी पक्षांचे ८ खासदार निलंबित; नेमकं झालं काय?
Rahul Gandhi News: लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान आज पुन्हा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. राहुल गांधी यांचे भाषण सुरू असताना झालेल्या गोंधळादरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांनी थेट टेबलांवर चढून सभापतींच्या व्यासपीठावर कागदपत्रे फेकली. कागदपत्रे फेकणाऱ्या सर्व विरोधी खासदारांवर सभापती ओम बिर्ला यांनी कडक कारवाई केली आहे. सभापतींनी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी आठ विरोधी खासदारांना निलंबित केले आहे. हे सर्व खासदार आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होऊ शकणार नाहीत. निलंबित केलेले खासदार काँग्रेस आणि सीपीएमचे आहेत.
निलंबित केलेल्या विरोधी लोकसभा खासदारांमध्ये अमरिंदर सिंग राजा वारिंग, डीन कुरियाकोसे, किरण कुमार रेड्डी आणि काँग्रेसचे माणिकम टागोर तसेच गुरजीत सिंग औजला, हिबी एडन, प्रशांत पोडोले आणि एस. वेंकटेश्वरन यांचा समावेश आहे. सभागृहात कागदपत्रे फेकल्याबद्दल आणि सभापतींच्या व्यासपीठाचा अनादर केल्याबद्दल त्यांना चालू अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी लोकसभेतून निलंबित करण्यात आले आहे.
यापूर्वी, खासदारांनी टेबलांवर चढण्याबद्दल विचारले असता, काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी सरकारवर निशाणा साधला. ” राहुल गांधी त्यांचे कर्तव्य बजावत आहेत, पण सरकार त्यांच्या कर्तव्यात अडथळा आणत आहेत. जर सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी खासदारांना निलंबित करावे.
केवळ सर्व काँग्रेस खासदारांनाच नाही तर संपूर्ण विरोधी पक्षातील खासदारांना निलंबित करा.” असे आव्हान त्यांनी दिले. दरम्यान, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी खासदारांच्या निलंबनाबाबत लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली.
दरम्यान, सोमवारी संसदेत २०२० साली झालेल्या भारत आणि चीन यांच्या सीमारेषेवरील संघर्षावरून मोठा गदारोळ झाला होता. त्यावरून कामकाज तहकूब करण्यात आले होते. आजही या गोंधळामुळे संसदेचे कामकाज विस्कळीत झाले. दुपारी २ वाजता संसद पुन्हा सुरू झाली तेव्हा राहुल गांधींनी त्यांचे भाषण सुरू केले.आजही त्यांनी चीन-अमेरिका कराराचा मुद्दा उपस्थित केल्याने गोंधळ उडाला. अध्यक्षीय सभापतींनी राहुल गांधींना राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलण्यास वारंवार सांगितले.
परंतु राहुल गांधी यांनी चीनचा मुद्दा उपस्थित करणे सुरूच ठेवले, त्यानंतर सभापतींनी त्यांना बोलण्याची परवानगी नाकारली आणि येथूनच गोंधळ सुरू झाला. गोंधळादरम्यान, विरोधी पक्षाचे खासदार टेबलांवर चढू लागले आणि काही खासदारांनी सभापतींच्या व्यासपीठाकडे कागदपत्रे फेकण्यास सुरुवात केली. गोंधळामुळे सभागृह दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर, गोंधळ निर्माण केल्याबद्दल आठ विरोधी खासदारांना निलंबित करावे लागले. या कृतीमुळे विरोधी पक्षाचे खासदार संतप्त झाले आणि त्यांनी ओरड सुरू केली, ज्यामुळे कामकाज उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले.
लोकसभेत बोलू दिले जात नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तडजोड झाली आहे आणि म्हणूनच त्यांनी अमेरिकेसोबत व्यापार करार केला आहे. आपली प्रतिमा मलिन होऊ पंतप्रधानांनी या कराराद्वारे देश विकला आहे आणि त्यांची प्रतिमा मलिन होण्याची भीती होती.






