पावणेदोन कोटींच्या सुविधांवर धूळ; शनिशिंगणापूर महाप्रसादालय उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
पोपट पिटेकर, शनिशिंगणापूर : जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्चर देवस्थानाचे भाविकांसाठी उभारण्यात आलेले अत्याधुनिक महाप्रसादालय तब्बल नऊ महिन्यांपासून बंद असल्याने हजारो भाविकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे कोट्यवधी रुपयांचा खर्च करून आधुनिक सुविधांनी सज्ज करण्यात आलेले भोजनालय वापराअभावी धूळ खात पडले आहे, तर दुसरीकडे देवस्थान प्रशासनाच्या संथ निविदा प्रक्रियेचा फटका ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब आणि सर्वसामान्य भाविकांना बसत असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्यास असलेले शनिभक्त उद्योजक किशोर माटा यांनी शनिदेवावरील श्रद्धेपोटी आणि भाविकांच्या सेवाभावातून सुमारे पावणेदोन कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक किचन यंत्रणा आणि विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, गेल्या नऊ महिन्यांपासून हे संपूर्ण भोजनालय बंद असल्याने त्यांची देणगी आणि आधुनिक यंत्रणा सध्या निष्क्रिय अवस्थेत पडून आहे.
देवस्थानच्या वाहनतळाजवळ उभारण्यात आलेल्या या भव्य महाप्रसादालयात दररोज सुमारे दोन ते अडीच हजार भाविकांना अत्यंत माफक दरात सात्विक भोजन उपलब्ध करून दिले जात होते. चपाती, भाजी, वरण-भात, शिरा यांसह विविध पदार्थांचा महाप्रसाद येथे दिला जात असल्याने देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत होते. महाप्रसाद योजनेसाठी अनेक उद्योजक, दानशूर व्यक्ती आणि भक्तांनी मोठ्या प्रमाणावर देणग्या दिल्या आहेत. त्यामध्ये ऑस्ट्रेलियातील उद्योजक किशोर माटा यांचे योगदान विशेष उल्लेखनीय मानले जाते.
तत्कालीन विश्वस्त मंडळाच्या काळात किशोर माटा यांनी प्रसादालयाला भेट दिली असता काही त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्या. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भोजनालयाचे आधुनिकीकरण करण्याची संकल्पना मांडली. मुंबईचे स्थापत्य अभियंता प्रदीप तेजवानी यांनी आराखडा तयार केला, तर देवस्थानचे स्थापत्य अभियंता योगेश वाबळे यांनी कामावर विशेष लक्ष ठेवून नूतनीकरण पूर्ण करून घेतले.
यामध्ये स्वयंपाकगृहाचा तळ आणि भिंतींच्या फरशा बदलण्यात आल्या. पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, इलेक्ट्रिकल कामे, रंगकाम, गॅस लाइन, वायुवीजन व्यवस्था यासह सर्व सुविधा अत्याधुनिक करण्यात आल्या. तसेच ताट धुण्याचे यंत्र, रेफ्रिजरेटर, किराणा साहित्य ठेवण्यासाठी कपाटे, स्टेनलेस स्टील टेबल, वाढणीचे साहित्य, स्वच्छतेसाठी जेट स्प्रे यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. पाकशाळा विभाग प्रमुख किशोर लबडे आणि अभियंता योगेश वाबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सुविधांमुळे स्वयंपाक प्रक्रिया अधिक वेगवान आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत दर्जेदार झाली आहे.
तत्कालीन विश्वस्त समितीने अंतर्गत विकासकामांसाठी ७ सप्टेंबर २०२५ रोजी महाप्रसादालय तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ३० सप्टेंबरपासून सेवा पुन्हा सुरू होईल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र, त्याच काळात राज्य सरकारने देवस्थानाचे विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासकीय नियंत्रणाखाली कारभार देण्याचा निर्णय घेतला.
२२ सप्टेंबर २०२५ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर विश्वस्त मंडळाने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने काही काळासाठी पुन्हा विश्वस्त समितीकडे कारभार सोपविण्याचे आदेश दिले, परंतु राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. अखेरीस सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी १९ डिसेंबर रोजी पदभार स्वीकारला. त्यांच्या मदतीसाठी उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांची कार्यकारी अधिकारी आणि प्रांताधिकारी सुधीर पाटील यांची सहायक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.मात्र, एवढी मोठी प्रशासकीय यंत्रणा अस्तित्वात असूनही महाप्रसादालय सुरू करण्याचा प्रश्न तब्बल नऊ महिन्यांपासून प्रलंबित राहिल्याने भाविकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
महाप्रसादालय पुन्हा सुरू करण्यासाठी कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी २४ एप्रिल रोजी ई-टेंडर प्रसिद्ध केले होते. इच्छुकांनी निविदा दाखल केल्या असून सध्या तांत्रिक तपासणी सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. पात्र निविदाधारकांचे दरपत्रक उघडल्यानंतर कार्यादेश देऊन महाप्रसाद सेवा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या प्रक्रियेच्या संथ गतीमुळे भाविक, स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Satara News: कोट्यवधींचा भुयारी मार्ग तयार, पण उद्घाटनाअभावी बंद; मसूर परिसरातील ग्रामस्थांची नाराजी
कोट्यवधी रुपयांची सुविधा उभी आहे, प्रशासनाकडे अधिकारी आहेत, निविदा प्रक्रियाही सुरू आहे; मग नऊ महिने उलटूनही श्री शनैश्चर देवस्थानाचे महाप्रसादालय नेमके कधी सुरू होणार? हा प्रश्न आता लाखो शनिभक्तांच्या मनात निर्माण झाला असून, भाविकांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेले हे महत्त्वाचे केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी दिवसेंदिवस तीव्र होत आहे. याबाबत शनैश्वर देवस्थान कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांना विचारले असता पुढच्या १५ दिवसांत सुरू होईल, एक महिन्यात सुरू होईल असे फोनवर प्रतिक्रिया दिलीये. मात्र हे भोजनालय लवकरच लवकर सुरु झालं नाही तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थ यांनी दिलाय.






