अकोला : अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार येथून जवळच असलेल्या करोडी फाट्यावर स्व. दादाभाऊ मानकर स्मृतीप्रित्यर्थ जंगी शंकर पटाला उत्तम प्रतिसाद मिळाला. या शंकरपटासाठी परिसरातील अनेक शेतकरी आपल्या बैलजोड्यांसह दाखल झाले होते.
गत सात-आठ वर्ष बंद असलेल्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी न्यायालयाच्या आदेशाने उठल्यानंतर पट प्रेमींमधे उत्साह संचारला होता. जिल्ह्यात तापमानाचा पारा ४४ वर गेलेल्यानंतरही पट पाहायला बघ्यांची गर्दी उसळली होती. काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रशांत गावंडे यांच्या हस्ते धावपट्टीचे तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या हस्ते बैलजोडीचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोपाल दातकर, रवी अरबट, कपिल ढोके, राजकुमार मंगळे, अमोल काळणे, निनाद मानकर, गणेश राऊत, श्याम गावंडे यांच्यासह आयोजन समितीचे धीरज गावंडे, अरविंद बोरचाटे, अनंत धुमाळे, भाग्येश खोले, अक्षय कराळे, सागर गेंद, पवन भाकरे, लंकेश धुमाळे यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते.
शंकरपटात अशी दिली गेली बक्षीसे !
ग्रामीण जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या बैलगाडा शर्यतीत या ठिकाणी १ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची बक्षिसे देण्यात आली असे आयोजकांनी सांगितले. पंचक्रोशीतील व राज्यातील अनेक नामवंत बैलजोड्या येथे दाखल झाल्या होत्या. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या बैलांची, त्यांच्या मालकांची व बघायला येणाऱ्या पटप्रेमींची चोख व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती.






