शरद पवार (फोटो- ट्विटर)
बारामती: आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार , काँग्रेस व शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार आहेत, त्यामुळे या पक्षाची एकत्रित बैठक घेऊन जागावाटप झाल्यानंतर उमेदवारी देण्याचा निर्णय होईल. लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात ३० जागा मिळाल्या, त्यामुळे जनतेला महाराष्ट्रात बदल करून माहितीचे सरकार बाजूला करायचे आहे, हे यावरून स्पष्ट होत असून राष्ट्रवादी काँग्रेस मधील जागावाटपा बाबत पक्षातील वरिष्ठ नेते एकत्रित बसून निर्णय घेतील, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षामध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत असून ते भेट घेत असल्याच्या प्रश्नाबाबत बोलताना पवार म्हणाले, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे नेहमी इच्छुक उमेदवारांसह त्यांचे समर्थक आपणास भेटत असतात. उमेदवारी देण्याबाबतचा निर्णय घेण्यापूर्वी राज्यातील संबंधित विधानसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा अभ्यास घेण्याचे काम सध्या सुरू आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते हा अभ्यास करत आहेत. दरम्यान विधानसभेची निवडणूक आम्ही तिन्ही पक्ष एकत्र लढवणार आहोत. त्यामुळे या तिन्ही पक्षातील नेत्यांची एकत्रित बैठक होऊन जागावाटप फायनल होईल, यानंतर उमेदवारी देण्याची प्रक्रिया सुरू होईल. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेसचा एक खासदार निवडून आला होता. तर राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले होते. मात्र या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे तब्बल ३० उमेदवार निवडून आले. राज्यातील जनतेला बदल हवा आहे, हे यावरून स्पष्ट होते. राज्यातील माहितीचे सरकार बाजूला करण्याच्या मनस्थितीमध्ये राज्यातील जनता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला अनुकूल स्थिती असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी खऱ्या अर्थाने चांगले काम करून दिल्लीचे नाव उज्वल ठेवण्याचे काम केले आहे, सध्याच्या मुख्यमंत्री देखील कर्तुत्वान महिला आहेत, त्यादेखील चांगल्या पद्धतीने काम करतील असा विश्वास वाटतो, असे शरद पवार यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.
वन नेशन, वन इलेक्शन या निर्णयाबाबत बोलताना आम्ही इंडिया आघाडीचे नेते या विषयावर एकत्रित बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. धनगर व मराठा आरक्षणाबाबत सामंजस्याची भूमिका सरकारने घेण्याची आवश्यकता आहे. राज्यातील सामाजिक वातावरण व्यवस्थित राहण्याची खबरदारी या विषयांमध्ये सरकारने घेण्याची आवश्यकता असल्याचे पवार यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना सांगितले.