फोटो सौजन्य सोशल मीडिया
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा आणि कुलसचिव अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा महोत्सवाचे नियोजन सुरू आहे. महोत्सव अवघ्या वीस दिवसांवर येऊन ठेपल्याने एकीकडे यजमान श्री शिवाजी महाविद्यालयात आयोजनाची लगबग वाढली आहे, तर दुसरीकडे सहभागी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या रंगीत तालमींनाही वेग आला आहे.विद्यार्थी विकास विभागाचे संचालक केदारनाथ काळवणे यांनी विद्यापीठाच्या युवा महोत्सव समितीसह महाविद्यालय परिसरातील तयारीचा आढावा घेतला.
स्पर्धक विद्यार्थ्यांची निवास व भोजन व्यवस्था, विविध स्पर्धांसाठी उभारण्यात येणारे रंगमंच, बैठक व्यवस्था, ध्वनी व प्रकाशयोजना, प्रवेश व्यवस्था तसेच इतर आवश्यक सुविधांची त्यांनी पाहणी केली. महोत्सवासाठी येणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
युवा महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य आणि ललित कला अशा विविध विभागांतील एकूण ३९ कला प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. या स्पर्धांसाठी महाविद्यालयाच्या परिसरात ९ रंगमंचांची निर्मिती करण्यात येत असून, प्रत्येक रंगमंचावर आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दर्जेदार ध्वनियंत्रणा आणि प्रकाशयोजनेवरही विशेष भर देण्यात आला आहे.
स्पर्धक विद्यार्थी, परीक्षक, पत्रकार तसेच महोत्सव पाहण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थी-प्रेक्षकांची गैरसोय होऊ नये, यासाठी महाविद्यालय प्रशासनाने स्वतंत्र नियोजन केले आहे. पावसामुळे कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये म्हणून वॉटरप्रूफ मंडपांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. निवास, भोजन आणि वाहतुकीसह विविध सुविधांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.
पाहणीवेळी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. शेख, प्रा. विश्वनाथ आवड, यशपाल खेडकर, राम पवार, गुणवंत सरवदे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व संबंधित पदाधिकारी उपस्थित होते. महोत्सव यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांवर विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवामुळे बार्शी शहरात युवा कलावंतांचा मेळा भरणार असून, विविध कलांच्या सादरीकरणामुळे सांस्कृतिक वातावरण निर्माण होणार आहे.
युवा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाशी संलग्न ५५ हून अधिक महाविद्यालयांमध्ये विविध कला प्रकारांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, संगमेश्वर महाविद्यालय, वालचंद महाविद्यालय, सांगोला महाविद्यालय, दयानंद महाविद्यालय यांच्यासह विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी दिवस-रात्र कसून सराव करत आहेत. काही महाविद्यालयांच्या कलाप्रकारांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे, तर काही ठिकाणी रंगीत तालमींना वेग आला आहे. युवा महोत्सवात अधिकाधिक पारितोषिकांवर नाव कोरण्याचा निर्धार महाविद्यालयांनी केला असून, त्यामुळे यंदा विविध स्पर्धांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथे भेट देऊन युवा महोत्सवाच्या नियोजनाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांची निवास व भोजन व्यवस्था, रंगमंच तसेच इतर सुविधांची पाहणी करण्यात आली. विद्यार्थ्यांना कला सादर करण्यासाठी दर्जेदार साऊंड सिस्टिम आणि उत्तम रंगमंच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनीही उत्तम तयारी करून आपल्या कलेचे सर्वोत्तम सादरीकरण करावे.
– केदारनाथ काळवणे, संचालक, विद्यार्थी विकास विभाग, सोलापूर विद्यापीठ
यंदाचा युवा महोत्सव दर्जेदार आणि कायम स्मरणात राहील, अशा पद्धतीने नियोजन करण्यात येत आहे. महोत्सवाची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. पाऊस आला तरी कार्यक्रमांमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून वॉटरप्रूफ मंडपांची व्यवस्था करण्यात येणार आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांच्या निवास, भोजनासह सर्व आवश्यक सुविधांची काळजी घेतली जाणार असून, विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ दिली जाणार नाही.
– डॉ. ए. बी. शेख, प्राचार्य, श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी






