फोटो सौजन्य सोशल मीडिया
यामध्ये दक्षिण सोलापूर, सांगोला आणि अक्कलकोट तालुक्यातील डेअरी तसेच विविध कार्यकारी संस्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सुनावणीदरम्यान डबल ठराव, ठरावावरील बनावट सह्या आणि प्रत्यक्षात ठरावच न झाल्याचे आक्षेप समोर आल्याची माहिती पुणे विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली.
जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवर संपूर्ण जिल्ह्यातून विविध गटांकडून एकूण ३५५ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. यापैकी सोमवारी १७०, तर मंगळवारी १६० अशा एकूण ३३० हरकतींवर आतापर्यंत सुनावणी पूर्ण झाली आहे. उर्वरित २५ हरकतींवर सुनावणी होणे बाकी आहे.
तसेच सांगोला तालुक्यातील काही दूध उत्पादक संस्था आणि सोसायट्यांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी अतिरिक्त वेळ मागितला आहे. त्यामुळे या संस्था आणि उर्वरित हरकतींवरील सुनावणी आज आणि उद्या होणार आहे.
मंगळवारच्या सुनावणीमध्ये अनेक संस्थांच्या मतदार पात्रतेवर गंभीर आक्षेप घेण्यात आले. यामध्ये अवसायनात गेलेल्या, न्यायालयाकडून स्थगिती मिळालेल्या तसेच नोंदणी रद्द झालेल्या संस्थांचा समावेश असल्याचे समोर आले.
एका मतदाराचे नाव पाठविण्यासाठी दोन वेगवेगळे ठराव जोडणे, अध्यक्षांच्या बनावट सह्या करणे आणि ठराव न घेताच मतदारांची नावे पाठविणे, असे आरोपही प्रतिस्पर्धी गटांकडून करण्यात आले आहेत. त्यामुळे या हरकतींच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Maharashtra News : भूजल वाढीसाठी जलसंधारणावर भर द्या; हसन मुश्रीफ यांचे प्रशासनाला निर्देश
हरकत घेतलेल्या संस्थांना जिल्हा बँक निवडणुकीत मतदानाचा अधिकार द्यायचा की नाही, याचा अंतिम निर्णय विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर घेणार आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यानंतर जिल्हा बँकेच्या मतदार यादीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल.
त्यामुळे आगामी निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या राजकीय दिग्गजांचे लक्ष आता या निर्णयाकडे लागले आहे. अंतिम मतदार यादीत कोणत्या संस्थांना स्थान मिळते आणि कोणत्या संस्थांची पात्रता बाद होते, यावर निवडणुकीच्या पुढील समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.






