पुणे : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने दुहेरी कारवाई केली आहे. पहिल्या कारवाईत सोन साखळी चोरणाऱ्यास पकडले असून, दुसऱ्या कारवाईत बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या साताऱ्याच्या तरुणाला पकडले आहे. शहरात मौजमजेसाठी साखळी चोरी करणाऱ्या प्रविण मधुकर डोंगरे (वय २३, रा. कर्वेनगर) याला अटक केली आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.
शहरातील सराईत, फरार आणि तडीपार आरोपींचा शोध घेण्यासाठी खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे व त्यांचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. यावेळी सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यामधील संशयीत कर्वेनगर येथे शाहू कॉलनी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने प्रविण डोंगरेला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्याने १ ऑगस्ट रोजी गिरीजा शंकर सोसायटी येथे ज्येष्ठ महिलेच्या गळातील चैन हिसकावून चोरल्याची कबूली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरेलेली दुचाकी जप्त केली आहे.
[read_also content=”महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी संसदेत कडक कायदा करावा : संभाजीराजे छत्रपती https://www.navarashtra.com/maharashtra/there-should-be-a-strict-law-in-parliament-to-prevent-incidents-of-womens-abuse-sambhaji-raje-chhatrapati-nrdm-313181.html”]
तर दुसऱ्या कारवाईत बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या सातारच्या संकेत मिलींद गोवेकर (वय २२, रा. कोरेगाव) याला अटक केली आहे. कात्रज परिसरात ही कारवाई केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल केला आहे. कात्रजमधील तळ्याजवळ एकजण पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्याला सापळा रचून पकडले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्तूल व १ जिवंत काडतूस मिळाले आहे. त्याने हे पिस्तूल कोठून आणले होते व तो त्याचा वापर कुठे करणार होता, याबाबत पोलीस तपास करत आहेत. ही कारवाई सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, पथकातील राजेंद्र लांडगे व त्यांच्या पथकाने केली आहे.