पंढरपूर : चला पंढरीसी जावू, बाप रखुमा देविवरा पाहू, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी…असा हरी नामाचा गजर करीत भक्ती रसात चिंब न्हाहून गेलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पालखीचे स्वागत जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. जिल्हा प्रवेशानंतर अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात नेत्रदीपक असे गोल रिंगण झाले.[blurb content=””][blurb content=””][blurb content=””]
संत तुकाराम महाराज यांच्या पालखी स्वागतासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अकलूजचे उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते. हाती दिंड्या पताका, मुखात अखंड हरी नामाचा गजर आणि विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन भक्तिमय वातावरणात उन्हा-ताणाची तमा न बाळगता आपल्या लाडक्या विठ्ठलाचे रूप पाहण्यास व त्याच्या पायाचे दर्शन घेण्यासाठी पालखी सोहळ्यातील वारकरी पंढरीच्या वाटेवर लगबगीने चालत आहेत.
नीरा नदी ओलांडून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे सकाळी ८.३० वाजता माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे आगमन झाले. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या अश्व आणि पादुकाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पालखी स्वागतापूर्वी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास भावपूर्ण निरोप देण्यात आला. अकलूज येथील गांधी चौकात अकलूज नगरपरिषदेच्या वतीने जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे स्वागत केले. सोलापूर जिल्ह्यातील पहिले गोल रिंगण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झाले. पताका, हांडे-तुळशी, विणेकरी, मृदंग व टाळकरी यांचे रिंगण झाले. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सपत्नीक अश्व पूजन केले. त्यानंतर अश्व रिंगणी धावले. अश्वाचे रिंगणी धावणे उपस्थित अकलूजकरांसाठी एक पर्वणीच ठरली. डोळ्यात साठवावा अशा नेत्रदीपक रिंगण सोहळ्याचा अभूतपूर्व आनंद प्रत्येक भाविक वारकऱ्यांना सुखावून गेला.
पालकमंत्र्यांनी केले सारथ्य
पालखी स्वागतानंतर पालखीच्या स्वागत ठिकाणापासून पालखीच्या रथाचे सारथ्य पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. यावेळी रथात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील यांनी यांच्या हस्ते भाविकांना ओआरएस पाकिटाचे वितरण करण्यात आले. तद्नंतर गळ्यात वीणा घेऊन पालकमंत्री विखे पाटील पालखी सोहळ्यात सहभागी झाले. यावेळी त्यांनी वारकरी भविकासमवेत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.
अमेरिकन राजदूताची उपस्थिती
सदाशिवराव माने विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या संत तुकाराम महाराज पालखी पालखी सोहळ्याचा सुखद अनुभव घेण्यासाठी अमेरिकेचे राजदूत माईक हेनकी हे आवर्जून उपस्थित होते.
हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी
रिंगण सोहळ्यावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. हे या रिंगण सोहळ्याचे आणखी एक आकर्षण ठरले. रिंगण सोहळ्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार नाना पटोले, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अकलूज व परिसरातील नागरिक उपस्थित होते.