फोटो सौजन्य - Social Media
पुणे क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि बुलढाणा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विदर्भ रिजन शुटिंगबॉल असोसिएशन यांच्या तांत्रिक सहकार्याने राज्यस्तरीय शालेय शुटिंगबॉल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा सोमवार (दि. २) ते मंगळवार (दि. ३) या कालावधीत बुलढाणा येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडणार आहेत.
या राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये १७ वर्षांखालील मुले व मुली सहभागी होणार असून, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येकी १० मुले व १० मुली स्पर्धेत आपली क्रीडाकौशल्ये सादर करणार आहेत. त्यामुळे राज्यभरातील शालेय स्तरावरील सर्वोत्तम खेळाडूंना एकाच मैदानावर खेळण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धांसाठी विविध जिल्ह्यांतील संघांसह संघ व्यवस्थापक, तज्ज्ञ पंचाधिकारी, प्रशिक्षक आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने बुलढाण्यात दाखल होणार आहेत. स्पर्धांचा उद्घाटन समारंभ सोमवारी सकाळी जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आला आहे. या उद्घाटन सोहळ्यास क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा क्रीडा परिषदेचे पदाधिकारी, शिवछत्रपती पुरस्कारार्थी खेळाडू, अमरावती विभागाचे क्रीडा उपसंचालक, विदर्भ रिजन शुटिंगबॉल संघटनेचे पदाधिकारी तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धांचा शुभारंभ होणार असून, खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार आहे.
दरम्यान, राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्यामुळे सोमवार व मंगळवार या दोन दिवसांत जिल्हा क्रीडा संकुलातील मैदाने सैन्य व पोलिस भरती सरावासाठी तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे सरावासाठी येणाऱ्या उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. मुलींच्या संघांसाठी जिल्हा क्रीडा संकुलातील नवीन इमारतीत, तर मुलांच्या संघांसाठी जुन्या इमारतीत निवासाची सोय करण्यात आली आहे. तसेच सर्व खेळाडू, अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी भोजन व्यवस्था देखील क्रीडा संकुल परिसरातच करण्यात आली आहे.
जिल्हा क्रीडा संकुलात शुटिंगबॉलचे दोन अद्ययावत मैदाने तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून, स्पर्धा सुरळीत पार पडाव्यात यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आयोजनासाठी स्वतंत्र समित्या गठीत करण्यात आल्या असून, त्यामध्ये आयोजन समिती, तक्रार निवारण समिती, उद्घाटन समिती, तांत्रिक समिती, मैदान व्यवस्था, निवास, भोजन, वैद्यकीय, प्रसिद्धी व स्वच्छता समित्यांचा समावेश आहे. या सर्व समित्या सक्रियपणे काम करत आहेत. निवास व्यवस्था, मैदानाची सज्जता आणि संकुल परिसराची स्वच्छता पूर्ण करण्यात आली असून, निमंत्रण पत्रिका, प्रमाणपत्रे, भोजन पासेस व इतर आवश्यक दस्तऐवजांचे काम अंतिम टप्प्यात आहे. या राज्यस्तरीय शालेय शुटिंगबॉल स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, तसेच स्थानिक शाळांतील विद्यार्थ्यांनीही स्पर्धा पाहण्यासाठी नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी केले आहे.






