हिंगणा वैजनाथ या परिसरात शेतकरीवर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. या परिसरातील अंबादास नामदेव धुईकर या शेतकऱ्याने (वय 70) पोलिसात तक्रार दिली . धुईकर यांच्या शेतात असलेल्या मंदिरात नवनाथांच्या एकूण नऊ मूर्ती, दत्त गुरुंची मूर्ती, महादेवाची पिंड आणि इतर देवी-देवतांचे फोटो ठेवण्यात आलेले आहेत. या मंदिराची पूजा नियमितपणे अंबादास धुईकर करून मंदिर बंद केले जात असे.
फिर्यादींच्या माहितीनुसार, 27 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 8 वाजता त्यांनी नियमित पूजा करून मंदिर बंद केले. मात्र, काल सकाळी 8 वाजता मंदिर उघडल्यावर लक्षात आलं की नवनाथ महाराजांच्या सर्व नऊ मूर्तींची डोकी तोडली गेली आहे. याशिवाय दत्त भगवान आणि इतर देवतांच्या मूर्तींना देखील नुकसान पोहोचलेले आढळले.
अंबादास धुईकर यांनी ही घटना तात्काळ गावचे पोलीस पाटील यांना कळवली. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत पोलीसांनी तात्काळ पंचनाम्यास सुरुवात केली. या सगळ्या प्रकाराबाबत नागरिकांची चौकशी देखील करण्यात आली. लवकरात दोषींना योग्य ती शिक्षा देण्यात यावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या घटनेमुळे संपूर्ण गावात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मंदिरातील मूर्ती तोडल्यामुळे धार्मिक भावना मोठ्या प्रमाणावर दुखावल्या गेल्या. त्यामुळे गावात संतापाची लाट पसरली आहे. गजानन महाराजांच्या पवित्र भूमीत जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा ते अतिशय लाजिरवाणं आहे.
शेगाव शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कुणाल दिलीप जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही घटनास्थळी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे, शेजारील नागरिकांचे बघितलेले विवरण व इतर पुरावे गोळा करून दोषी ओळखण्याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.” पोलिसांचा सर्थीचा तपास सुरु आहे. त्यामुळे दोषी लवकरात लवरात समोर येईल.






