यंदा तिखट-मसाल्यामुळे डोळ्यांत येणार पाणी; अवकाळीचा बसतोय मोठा फटका
पिंपरी : उन्हाळा सुरू झाला की घराघरांत वर्षभराच्या तिखट-मसाल्यांची लगबग सुरू होते. मात्र, यंदा गृहिणींचे बजेट कोलमडणार असल्याचे चित्र आहे. लांबलेला पाऊस आणि लहरी हवामानामुळे लाल मिरचीच्या उत्पादनात मोठी घट झाली असून, बाजारपेठेत मिरचीच्या दराने उच्चांक गाठला आहे. सुप्रसिद्ध ब्याडगी मिरचीचा दर ५५० रुपये प्रति किलोवर पोहोचल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागत आहे.
उत्पादनात घट, आवक मंदावली महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांतून पिंपरी-चिंचवड आणि पुण्याच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक होते. मात्र, यंदा या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये मिरची लागवडीच्या काळात पावसाने ओढ दिली, तर काढणीच्या वेळी अवकाळी पावसाने झोडपले. या दुहेरी संकटामुळे मिरचीच्या उत्पादनावर ४० ते ५० टक्क्यांपर्यंत परिणाम झाला आहे. परिणामी, मागणीच्या तुलनेत आवक अत्यंत कमी आहे.
हेदेखील वाचा : Gahunje stadium : गंहुजे येथील आंतरराष्ट्रीय मैदानाला दिवंगत नेते अजित पवारांचे नाव ? आमदार सुनील शेळकेंची विधीमंडळात मागणी
मसाल्याचे इतर पदार्थही कडाडले केवळ मिरचीच नव्हे, तर मसाला तयार करण्यासाठी लागणारे इतर घटकही महागले आहेत. धणे आणि जिरे यांच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. दालचिनी, लवंग, मिरी आणि तमालपत्र यांच्या दरातही मोठी वाढ झाल्याने घरगुती मसाला तयार करणे यंदा महागडे ठरणार आहे.
मिरचीच्या खरेदीत कपात
गृहिणींच्या नियोजनाला फटका उन्हाळ्याच्या सुट्टीत पिंपरी-चिंचवडमधील विविध पेठांमध्ये (उदा. चिखली, भोसरी, पिंपरी कॅम्प) मिरची खरेदीसाठी गर्दी असते. मात्र, वाढलेल्या दरांमुळे अनेकांनी यंदा मिरचीच्या खरेदीत कपात केली आहे. “दरवर्षी आम्ही ५ ते ७ किलो मिरची साठवतो, पण यंदा दर पाहून केवळ ३ किलोच खरेदी केली आहे”, असे राणी चव्हाण यांनी सांगितले.
“हवामान बदलामुळे मिरचीची प्रत आणि उत्पादन दोन्हीवर परिणाम झाला आहे. सध्या आवक कमी असल्याने दर तेजीत आहेत. नवीन हंगामातील माल पूर्ण क्षमतेने बाजारात आल्याशिवाय दरात घट होण्याची शक्यता कमीच आहे.”
– रघुनंदन कामत, व्यापारी.






