राज्यात विधानसभा निवडणुकाची धामधूम सुरू असून सोमवारनंतर प्रचाराचा तोफा धडाडणार आहे. मात्र तिसऱ्या आघाडीत सहभागी झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आणि राजू शेट्टी यांना ऐन निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी संघटनेला रामराम ठोकला. वैभव कांबळे यांनी संघटनेतून बाहेर पडताना राजू शेट्टी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
हेही वाचा-देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ; गुप्तचरांच्या अहवालानंतर सरकारचा निर्णय, घराबाहेर कमांडो तैनात
राजू शेट्टी हुकुमशाह असल्यासारखं वागतात, असा आरोप वैभव कांबळे यांनी केला आहे. राजू शेट्टी यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता विधानसभा निवडणुकीसंदर्भात निर्णय घेतले आहेत, असे आरोप वैभव कांबळे यांनी केले आहेत. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा बिल्ला काढून संघटनेला सोडचिठ्ठी देत असल्याचं जाहीर केलं. कांबळे यांनी आज राजू शेट्टी यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवला आहे. ऐन निवडणुकीत महत्त्वाचा नेता सोडून गेल्यामुळे स्वाभिमानी संघटनेला मोठा धक्का मानला जात आहे.
लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी महाविकास आघाडीसोबत जाणार अशी चर्चा होती. मात्र मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्यास राजू शेट्टी यांनी नकार दिला. या निवडणुकीत राजू शेट्टी यांचा दारूण पराभव झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी तिसरी आघाडी स्थापन केली आहे. बच्चू कडू, संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांनी एकत्र येत तिसरी आघाडी स्थापन केली आहे.
त्यामुळे राजू शेट्टी यांच्या निर्णयावर संघटनेतील काही नेते आणि कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे यांनी पदाचा राजीनामा देत कार्यकर्त्यांसह संघटनेतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांना ऐन निवडणुकीत हा मोठा धक्का मानला जात आहे.
संघटना सोडताना वैभव कांबळे यांनी राजू शेट्टी यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. राजू शेट्टी यांचा नेहमी मनमानी कारभार सुरू असतो. हुकूमशहा असल्यासारखे वागत असतात. तिसरी आघाडी स्थापन करताना कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं नाही, असे आरोप त्यांनी केले आहेत. यावर राजू शेट्टी काय उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.