कल्याण : जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांनी आज कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाबाहेर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
२३ मे १९९९ रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन उपक्रमाला सुरुवात झाली. गेले पंचवीस वर्षे ना नफा ना तोटा या तत्त्वावर महापालिकेचा हा उपक्रम चालत आलेला आहे. परिवहन उपक्रमाला महाराष्ट्र शासनाची भविष्य निर्वाह निधी निवृत्ती वेतन १९८२ जुनी पेन्शन योजना लावणे अभिप्रेत होते. परंतु तत्कालीन परिवहन व्यवस्थापक यांनी केंद्र शासनाची अंशदायी भविष्य निर्वाह निधी योजना कोणत्याही समितीचा ठराव न घेता आपल्या मनमानी कारभाराने परिवहन कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर रित्या लावली. परिवहन कर्मचारी हे १९९९ ते २००५ या कालावधीत भरती झालेले आहेत.
[read_also content=”‘चार वर्षांपासून मी…’, मनसे आमदार राजू पाटील यांनी नाव न घेता व्यक्त केली खंत https://www.navarashtra.com/maharashtra/mns-mla-raju-patil-expressed-regret-over-the-non-cooperation-of-mp-shrikant-shinde-and-minister-ravindra-chavan-547404.html”]
जुनी पेन्शन संदर्भात महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेने वारंवार प्रशासनाशी पत्रव्यवहार केला. परंतु न्याय न मिळाल्यामुळे युनियनने मुंबई हायकोर्ट येथे केस दाखल केली. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे निवृत्तीवेतन नियम १९८२ जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आदेश दिले. परंतु याची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाने न केल्यामुळे पुन्हा युनियनने कोर्टात कॉन्टेप्ट पिटिशन दाखल केली आणि त्याचा निकाल जजमेंट आदेश देण्यात आला.
तत्कालीन आयुक्तांनी जुनी पेन्शन योजना लावण्या संदर्भात महाराष्ट्र शासनाकडे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने परिवहन कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम १९८२ नुसार जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत आपल्या स्तरावर धोरणात्मक निर्णय घेण्यास सांगितले आहे.
परिवहन उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी वर्गाची भरती प्रक्रिया कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने राबविल्यामुळे तसेच परिवहन उपक्रमाची पालक संस्था असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवर असलेल्या ५२० कर्मचारी, अधिकारी तसेच ४४ सेवानिवृत्त कर्मचारी आणि ५४ मयत कर्मचारी या सर्वांचे दायित्व महापालिकेचे आहे.
या सर्व बाबी लक्षात येता परिवहन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लावण्या संदर्भात महापालिका प्रशासनाकडून विलंब होत असल्यामुळे महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने परिवहन कर्मचारी, अधिकारी यांना जुनी पेन्शन संदर्भात न्याय मिळवून देण्यासाठी एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष महेश पाटील, कार्याध्यक्ष अनिल पंडित, युनिट अध्यक्ष गोरखनाथ गोसावी, कार्याध्यक्ष गजानन नाईक, कृष्णा टकले, भारत आहीरे, मुख्य कार्यकारणी सदस्य रघुनाथ कांदे, जगदीश भरसट, संजय पांडे, विजय सावंत, नारायण म्हसके, मंगेश साळवी आदि पदाधिकारी आणि कर्मचारी उपोषणात सहभागी झाले होते.