होन्याळीच्या प्राथमिक शाळेत पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या घरफाळा माफीचा निर्णय
संभाजीनगर : सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, तीव्र उष्णताही जाणवत आहे. अशातच शाळेतील विद्यार्थी पटसंख्या टिकवण्यासाठी शिक्षकांना मोठी पायपिट करावी लागत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. उन्हाळ्याची सुट्टी शिक्षकांनी आता विद्यार्थी मिळविण्यासाठी खर्ची घालण्यास सुरुवात केली आहे.
शहरी भागातील शिक्षक ग्रामीण भागात जाऊन त्यांच्या पाल्याने आपल्याच शाळेत प्रवेश घ्यावा, यासाठी पालकांची मनधरणी करत आहेत. तर पालक ‘हो, पुढे पाहू, नंतर सांगतो’, अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. एखाद्या विद्यार्थ्याचा दाखला हातात पडला तर शिक्षकांचा आनंद द्विगुणित होतो, नाही मिळाला तर निराशा पदरी पडत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ग्रामीण भागातील शाळांचे निकाल नुकतेच विद्यार्थ्यांच्या हाती आले. यामुळे माध्यमिक शाळांच्या शिक्षकांची आता आपल्या शाळांना विद्यार्थी मिळविण्यासाठी विद्यार्थी शोध मोहीम सुरू केली आहे. विनाअनुदानित शाळांची संख्या झपाट्याने वाढल्याने तसेच गावोगावी शाळांचे पेव फुटल्याने विद्यार्थी प्रवेशाची समस्या निर्माण झाली आहे.
शासनाच्या पट पडताळणीमुळे शिक्षकवर्ग कोंडीत
शासनाने केलेल्या पट पडताळणीमुळे तर शिक्षकवर्ग मोठ्या कोंडीत सापडलेला आहे. वास्तविक, पाहता शालेय नियमानुसार एक तुकडीसाठी 30 विद्यार्थ्यांची पटसंख्या तर विद्यार्थी प्रवेशासाठी शाळेतर्फे विविध प्रलोभने पालकांना दिली जात आहे.
नोकरी टिकवण्याची गुरुजींची धडपड
मागील अनेक वर्षांपासून शिक्षक भरती बंद असून, अनेक उच्चशिक्षित उमेदवार रिकामटेकडे आहेत. त्यांना अजूनही रोजगार न मिळाल्याने संधीची प्रतीक्षा आहे. तर काही शिक्षक कसे बसे नोकरीवर लागले आहेत. मात्र, एकीकडे विद्यार्थ्यांची पटसंख्याच नसेल तर आपल्या नोकरीचे काय? हा त्यांच्यासमोर प्रश्नच आहे.
शाळेने आपली शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी
शाळेने आपली शैक्षणिक गुणवत्ता सुधारल्यास विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी शिक्षकांना दारोदारी फिरण्याची वेळच येणार नाही. पालकही स्वतः हून पुढाकार घेत आपल्या पाल्याचा प्रवेश उत्कृष्ट शाळेत करतील. मात्र, शाळा व्यवस्थापन शाळा सुधारणेकडे लक्ष न देता केवळ शाळेची तुकडी टिकावी याकडेच लक्ष देत आहे.