फोटो - सोशल मीडिया
पुणे : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी मोट बांधण्यास सुरुवात केली असून जागावाटपाची बोलणी सुरु आहे. दरम्यान, भाजपने देखील गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वामध्ये विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गट देखील कामाला लागला आहे. ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेची तयारी सुरु केली असून त्यांचा दौरा देखील निश्चित करण्यात आला आहे. पुण्यापासून दिल्लीपर्यंत त्यांचे दौरे नियोजित करण्यात आले आहे.
पुणे व दिल्ली दौरा
यंदाची विधानसभा निवडणूक रंगतदार ठरणार आहे. पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर ही राज्यातील निवडणूक होणार असून यामुळे राजकीय समीकरण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडी जोरदार तयारी करत आहेत. ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांची दिल्लीमध्ये देखील बैठक होणार आहे. त्यांच्या पक्षाचे नवीन नाव व चिन्ह रसातळातील माणसांपर्यंत पोहचवण्याचा मानस ठाकरे गटाचा असणार आहे. त्यासाठी जोरदार प्रचार, सभा आणि बैठका यांचे सत्र होणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, उद्धव ठाकरे हे येत्या 3 ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर असणार आहेत. तसेच त्यानंतर 4 ऑगस्ट रोजी राजधानी दिल्लीचा दौरा करणार आहेत.
पुणे ठरतंय राजकीय केंद्रस्थान
राजकीय बैठकांसाठी पुणे शहर केंद्रबिंदू ठरत आहे. भाजपने देखील अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये महाअधिवेशन घेतले. विधानसभेसाठी पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यानंतर आता ठाकरे गट देखील पुण्यामधून त्यांच्या प्रचार कार्यक्रमास सुरुवात करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यामध्ये ते कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. ठाकरे गटाच्या या पुण्यातील शिबिरामध्ये आगामी निवडणूकांचा कार्यक्रम, प्रचार व पक्षांची रुपरेषा याबद्दल माहिती दिली जाणार आहे.*- शिबिराला पुणे जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे स्वतः मार्गदर्शन करणार असल्यामुळे ठाकरे गटासाठी हे पुण्यातील शिबीर महत्त्वाचे ठरणार आहे.