ठाणे/ स्नेहा काकडे : अनधिकृत बांधकामाबाबत पालिका आता अॅक्शनमोडवर काम करत आहे. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरिक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या 33अनधिकृत बांधकामांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. ही कारवाई 19आणि 20जून रोजी करण्यात आली. यात संपूर्ण इमारत, प्लिंथ, कॉलम, स्लॅब, वाढीव बांधकाम याप्रकारच्या बांधकामांचा समावेश आहे. यापुढेही अनधिकृत बांधकामांच्या निष्कासनाची प्रभाग समितीनिहाय कारवाई सुरूच राहणार आहे.
अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी प्रत्येक प्रभाग समिती क्षेत्रात सहाय्यक आयुक्त यांच्या नेतृत्वात विशेष पथकाची स्थापना केली आहे. या पथकांनी आपापल्या क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाबाबतच्या तक्रारी आणि प्रत्यक्ष पाहणी यांच्या आधारे तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. त्यानुसार, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
एअर इंडियाच्या विमानाला पक्ष्याची धडक; पुणे विमानतळावर सुखरूप लँडिंग
तळ मजला अधिक चार मजले, सीआरझेड क्षेत्रात उभारण्यात आलेले भंगाराचे गोडावून, व्याप्त अनधिकृत इमारतीवरील वाढीव बांधकाम, प्लिंथ, दुकानातील वाढीव बांधकाम आदी वेगवेगळ्या तक्रारींनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात 19आणि 20जून रोजी झालेल्या कारवाईत एकूण 33अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती उपायुक्त (अतिक्रमण विभाग) शंकर पाटोळे यांनी दिली. ही कारवाई यानंतरही सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कारवाईमध्ये उपायुक्त (परिमंडळ), सर्व सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण आणि बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले. या कारवाईसाठी पोकलेन, जेसीबी, गॅस कटर, ट्रॅ्क्टर ब्रेकर, मनुष्यबळ यांचा वापर करण्यात आला. पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आल्याचेही पाटोळे यांनी सांगितले.
कारवाईच्या आकडेवारीचा तक्ता
• नौपाडा-कोपरी – 02
• दिवा – 12
• मुंब्रा -03
• कळवा – 04
• उथळसर -01
• माजिवडा-मानपाडा -05
• वर्तक नगर – 02
• लोकमान्य नगर – 02
• वागळे इस्टेट – 02
एकूण ठाणे पालिका हद्दीतील 33 ठिकाणांवर मनपाने हातोडा चालविला आहे.