ठाणे/ स्नेहा जाधव,काकडे : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते या सर्व मोबाईल मेडिकल युनिट टीमना टॅबलेट्स वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या समिती सभागृह, जिल्हा परिषद ठाणे येथे हा कार्यक्रम पार पडला.
या टॅबलेट्समध्ये विशेष सॉफ्टवेअर उपलब्ध करण्यात येणार असून यामुळे रोजच्या आरोग्यसेवा अहवालाची नोंद (Daily Reporting) ऑनलाईन पद्धतीने केली जाईल. यामुळे मोबाईल मेडिकल युनिटचे कार्य अधिक मॉडर्न, अद्ययावत व कार्यक्षम होणार आहे.
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM-Janman) आणि प्रधानमंत्री पीव्हीटीजी विकास मिशनअंतर्गत ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या १० मोबाईल मेडिकल युनिट्स ग्रामीण व आदिवासी भागातील कातकरी समाज तसेच दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरवत आहेत.
या युनिट्समध्ये चार जणांची वैद्यकीय टीम असते. वैद्यकीय अधिकारी, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट आणि सहाय्यक यामार्फत दुर्गम भागातील नागरिकांना मोफत तपासणी, औषधोपचार आणि आरोग्यविषयक सल्ला दिला जातो.
ठाणे जिल्ह्यातील मोबाईल मेडिकल युनिट कार्यरत:
• शहापूर तालुका – ३ युनिट
• मुरबाड शहर व ग्रामीण – ३ युनिट
• भिवंडी तालुका – २ युनिट
• कल्याण तालुका – १ युनिट
• अंबरनाथ तालुका – १ युनिट
मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी या उपक्रमाबाबत सांगितले की, “मोबाईल मेडिकल युनिट हे केवळ वाहन नाही, तर ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील २६० गावांसाठी चालतं-बोलतं आरोग्य केंद्र आहे. डॉक्टर, तपासणी सुविधा आणि औषधोपचार थेट गावाच्या दारी पोहोचवणे हीच या उपक्रमाची खरी ताकद आहे. नव्या टॅबलेटच्या माध्यमातून डेटा संकलन आणि रिपोर्टिंग अधिक अचूक होऊन सेवा अधिक वेगवान व परिणामकारक बनेल. मोबाईल मेडिकल युनिटच्या कार्यात आणखी सुलभता व दर्जा वाढविण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्नशील राहील. महाराष्ट्र राज्यात या उपक्रमाला मिळालेला प्रथम क्रमांक हा आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचा सन्मान आहे.”
राज्यात एकूण १०३ मोबाईल मेडिकल युनिट्स मंजूर असून, त्यापैकी ८७ PVTG जिल्ह्यांसाठी आणि १६ इतर जिल्ह्यांसाठी आहेत. सद्यस्थितीत राज्यभरातील ७९ युनिट्स कार्यरत आहेत. या योजनेचा उद्देश म्हणजे ज्या ठिकाणी आरोग्य सुविधा पोहोचणे कठीण आहे, अशा भागातील नागरिकांना त्यांच्या दारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे.जिल्हा परिषदेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, मोबाईल मेडिकल युनिट आपल्या गावात येत असल्यास त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी, असं सांगण्यात आलं आहे.