
अजित पवार यांच्या अकाली जाण्याने प्रचार थांबला; कर्जत,नेरळ,माथेरान मध्ये कडकडीत बंद
कर्जत : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाला आज (28 जानेवारी 208) सकाळी अपघात झाला. त्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकी मधील प्रचाराच्या तोफा थंडावल्या. सर्व राजकीय पक्षांनी जाहीर प्रचार करण्याचे रद्द केले असून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कर्जत,नेरळ,माथेरान येथील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सडेतोड रोखठोक बोलल्याने प्रसिद्ध असलेले अजित पवार यांचे सकाळी विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र स्तब्ध झाला असून कर्जत तालुक्यातील जनतेने आपल्या तालुक्यातील सर्व बाजारपेठा बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली.कर्जत शहरात व्यापारी फेडरेशन कडून आवाहन केल्यानंतर कर्जत आणि दहिवली येथील बाजारपेठ व्यवहार थांबले.नेरळ गावात व्यापारी फेडरेशन कडून 11 ते पाच या कालावधीत बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले,तर नेरळचा आठवडा बाजार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नेरळ बाजारपेठेतून एक फेरी मारत व्यापारी वर्गाला आवाहन केले. त्यानंतर बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय बाहेरून येऊन दुकाने मांडणाऱ्या व्यापाऱ्यांनी घेतला.माथेरान हे पर्यटन स्थळ असल्याने दुपारी माथेरान शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेऊन त्या बंद मध्ये सर्व व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. त्याचवेळी तालुक्यातील कशेळे, कडाव,कळंब आणि डिकसळ येथील बाजारपेठ बंद ठेवत स्थानिकांनी श्रद्धांजली वाहिली.
अजित पवार यांना नेरळ मध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून निवडणुकीचा प्रचार बंद करीत श्रद्धांजली वाहिली.या घटनेच्या पार्श्वभूमीवर महायुतीने मोठा निर्णय घेत आजचे सर्व नियोजित निवडणूक प्रचार दौरे आणि कार्यक्रम रद्द केले आहेत. अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त समजताच नेरळ आणि परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये शोककळा पसरली. कार्यकर्त्यांनी एकत्र येत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
एक कणखर नेतृत्व आणि विकासाचा ध्यास असलेला नेता आपण गमावला आहे, अशा भावना यावेळी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू असतानाच ही बातमी आली. घटनेचे गांभीर्य आणि आदरातिथ्य राखत, महायुतीच्या सर्व उमेदवारांनी आजचा आपला प्रचार अधिकृतपणे रद्द केला आहे. कोणतीही रॅली, कोपरा सभा किंवा पदयात्रा आज काढली जाणार नाही. कार्यकर्त्यांना आपापल्या भागात शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.