
10 जणांच्या मृत्यूनंतर संताप; भिवंडी महापालिकेत राष्ट्रवादीचा हल्लाबोल, काँग्रेस कार्यालयासमोर घोषणाबाजी
आंदोलकांचा आरोप आहे की, कोहिनूर अपार्टमेंट दुर्घटनेला चार दिवस उलटूनही महापालिका आयुक्त सुट्टीवर असून ते अद्याप भिवंडीत परतलेले नाहीत. अशा गंभीर घटनेनंतरही वरिष्ठ प्रशासन अनुपस्थित असल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या महापालिका प्रशासनासह संबंधित अधिकारी, प्रभाग अधिकारी अनिल घूघरे आणि बीट निरीक्षक अमूल वारघडे यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी शहरातील जर्जर इमारती, खराब रस्ते, मोठमोठे खड्डे आणि नागरिकांच्या सुरक्षेकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा मुद्दाही उपस्थित केला. “प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे जीव जात आहेत आणि संपूर्ण व्यवस्था कोलमडली आहे,” असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यानंतर आंदोलकांनी महापालिका कार्यालयासमोरील काँग्रेसच्या केंद्रीय कार्यालयासमोर जाऊन घोषणाबाजी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, कोहिनूर दुर्घटनेप्रकरणी जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी अधिक तीव्र होत असून या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
दोन दिवसापूर्वी भिवंडीत चार मजली इमारत कोसळून दहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. एनडीआरएफच्या पथकांनी ढिगाऱ्याखालून एका महिलेला जिवंत बाहेर काढले. या महिलेला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भिवंडीत मोठी दुर्घटना; चार मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, 7 जणांचा मृत्यू