डोंबिवलीतील स्मशानभूमीच्या छताला गळती; भिजलेली लाकडे, अंत्यसंस्कार करायचे कसे?
डोंबिवलीतील शिवमंदिर पथवरील वैकुंठ स्मशानभूमीत गळक्या छतामुळे अंत्यसंस्काराला आलेल्या नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. शनिवारीही पत्रकार आकाश गायकवाड यांच्या वडिलांचे निधन झाल्याने तेथे आलेल्या गायकवाड कुटुंबियांना आणि त्यांच्या नातेवाईकांनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
त्याबाबत वारंवार प्रसार माध्यमांनी आवाज उठवूनही महापालिका प्रशासनाचे डोळे उघडत नाहीत. कृष्णा गायकवाड(७८) यांच्या निधनाला महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संजय जाधव, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनीही ती दुरावस्था बघितली.
गायकवाड नातेवाईकांनी ओली लाकडे, गळकी छत, अग्नी भडकता रहावा यासाठी रॉकेलचा वापर यामुळे त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.
कुठेही बसायला जागा नाही एवढ्या ठिकाणी गळती लागलेली आहे. सगळ्याच ठिकाणच्या अग्नी कुड्यांची जागा सोडता सर्वत्र गळती लागली होती. सगळे पत्रे गळत असल्याने उभे राहायचे तरी कुठे असा सवाल नागरिकांनी केला. महापालिका करतेय काय? असेही ते म्हणाले.
१० रॅकमध्ये ही गळती
शुक्रवार दुपारपासून तेथे २९ जणांचे अंत्यसंस्कार झाले, सगळ्यांना पाणी गळतीची समस्या भेडसावली. स्मशानभूमीत येतानाच पाण्याचे डबके होते, त्यातून मार्ग काढत नागरिकांना यावे लागले. तेथे डेंग्यूची अवस्था आहे. जिथे नागरिकांना बसायला जागा आहे त्या ठिकाणी कमालीची अस्वच्छता होती. आलेल्या नागरिकांचा घाण, दर्प यामुळे श्वास घुसमटला. ज्येष्ठ नागरिकांनी अखेर गळक्या छताच्या धारेखाली उभे राहून अंत्यसंस्कार केले. त्या स्मशानभूमीसाठी काही वर्षांपूर्वी खर्च केलेले लाखो रुपयांचा निधी गेला कुठे असा सवालही त्रस्त नागरिकांनी केला. स्वच्छतागृहात देखील घाण होती. पावसामुळे सगळ्या ठिकाणी ओलेचिंब झाल्याची अवस्था होती.