उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर
मिरा-भाईंदर शहरातील जुन्या गावांमधील मालमत्तांचे नगरभूमापन करण्याचा निर्णय महापालिकेने २००७ मध्ये घेतला होता. त्यासाठी तीन खासगी संस्थांची नियुक्ती करण्यात आली होती. शहरातील एकूण १९ गावांपैकी १४ गावांचे सिटी सर्वेक्षण पूर्ण झाले. मात्र उत्तन, चौक, पाली, डोंगरी आणि तारोडी या पाच गावांनी सुरुवातीला सिटी सर्वेक्षणाला विरोध केल्याने या गावांचे सर्वेक्षण रखडले.
दरम्यान, नंतर या पाच गावांनी सिटी सर्वेक्षणास संमती दिली. त्यानंतर २०१८ मध्ये महापालिकेने प्रशासकीय ठराव करून या गावांचे नगरभूमापन करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला अनेक वर्षे उलटूनही प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम सुरू झाले नसल्याचा मुद्दा नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी महासभेतील प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला.
सिटी सर्वेक्षणाअभावी या गावांतील नागरिकांना आपल्या मालमत्तेचा अधिकृत मालकी हक्क सिद्ध करताना अडचणी येत आहेत. त्याचबरोबर बांधकाम, मालमत्ता हस्तांतरण आणि इतर मालमत्तेशी संबंधित कामांवरही त्याचा परिणाम होत आहे.
या गावांमध्ये अनेक कुटुंबे पिढ्यान्पिढ्या राहत असून, त्यांचा जन्म आणि मृत्यूदेखील याच गावांमध्ये झाला आहे. मात्र अद्याप त्यांच्या जमिनींचे अधिकृत नगरभूमापन पूर्ण झालेले नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे स्थानिकांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप बगाजी यांनी केला.
२०१८ मध्ये पाच गावांनी सर्वेक्षणास संमती दिल्यानंतर महापालिकेने संबंधित संस्थेला काम देण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र पूर्वीच्या दराने काम करणे संबंधित संस्थेला आर्थिकदृष्ट्या अडचणीचे ठरत असल्याने संस्थेने वाढीव दराने सर्वेक्षण करण्याची मागणी केली.
मात्र ठाणे भूमी अभिलेख विभागाने दरवाढीस नकार दिल्याने या कामाचा पेच निर्माण झाला. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी संबंधित संस्थेला जुन्या दरानेच सर्वेक्षण करण्याची विनंती केली. या विनंतीला संस्थेने संमती दर्शवली.
दरम्यान, उत्तन परिसरातील विकास आराखड्याचे काम सुरू असल्याने संबंधित संस्थेने ड्रोनच्या माध्यमातून प्राथमिक सर्वेक्षण केले आहे. या प्राथमिक सर्वेक्षणाचा अहवाल मंजुरीसाठी सिटी सर्वे विभागाकडे पाठविण्यात आला आहे.
ड्रोन सर्वेक्षणाचा अहवाल मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम हाती घेऊन पाच गावांचे नगरभूमापन पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती नगररचनाकार पुरुषोत्तम शिंदे यांनी महासभेत दिली. त्यामुळे आता सिटी सर्वे विभागाकडून या अहवालाला मंजुरी कधी मिळते आणि प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम कधी सुरू होते, याकडे उत्तनसह पाचही गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पाच गावांचे नगरभूमापन पूर्ण होईपर्यंत महापालिका क्षेत्रातील ज्या १४ गावांचे सर्वेक्षण यापूर्वीच पूर्ण झाले आहे, त्या गावांतील नागरिकांना मालमत्तेच्या सनद देण्याचे काम ठाणे भूमी अभिलेख विभागाकडून होणे अपेक्षित आहे. मात्र हे कामदेखील अद्याप रखडल्याचे महासभेत समोर आले.
या कामाला गती देण्यासाठी चौकशी अधिकारी नेमण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर महापौरांनी संबंधित कामाचा आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करण्यासाठी चौकशी अधिकारी नेमण्याचे आदेश दिले. उत्तन, चौक, पाली, डोंगरी आणि तारोडी या पाच गावांचे सिटी सर्वेक्षण पूर्ण होऊन स्थानिक नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचा अधिकृत हक्क मिळणार का, तसेच १४ गावांतील नागरिकांना सनद मिळण्याचा मार्ग कधी मोकळा होणार, याकडे आता संपूर्ण मिरा-भाईंदरचे लक्ष लागले आहे.



