१५ वर्षीय मुलगी आणि ७ वर्षीय चिमुरडीवरील अत्याचाराने हादरले कल्याण; महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र पोलीस चौकीची मागणी
या घटनांमध्ये एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली, तर त्यानंतर केवळ ७ वर्षीय निष्पाप चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. या दोन्ही घटना केवळ गुन्हे नसून समाजाच्या संवेदनशीलतेला आणि विवेकबुद्धीला हादरा देणाऱ्या असल्याचे आमदार गायकवाड यांनी सभागृहात नमूद केले. त्यांनी पीडित मुलींना तातडीने सर्वतोपरी मदत देण्याची मागणी करत आर्थिक, वैद्यकीय आणि मानसिक आधार उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. तसेच, या प्रकरणांतील आरोपींवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसेल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी कल्याण पूर्वातील चक्की नाका, १०० फुटी रोड आणि मलंग रोड परिसरात स्वतंत्र पोलीस चौकी तातडीने मंजूर करून कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. याशिवाय या भागात पोलीस गस्त वाढवून सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
कल्याणमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी रविवारी तिघांना अटक करण्यात आली. कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी सांगितले की, हे तिन्ही आरोपी गेल्या आठ महिन्यांपासून मुलीच्या निरागसतेचा गैरफायदा घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. हे प्रकरण तेव्हा उघडकीस आले, जेव्हा मुलगी तिच्या चुलत बहिणीसोबत खेळत असताना काहीतरी असे करू लागली ज्यामुळे तिच्या आजीला संशय आला. आजीने मुलीला विचारले. मुलीने सांगितलेल्या गोष्टी ऐकून आजीला धक्का बसला. आजीने ही गोष्ट तिच्या मुलाला आणि आईला सांगितली. त्यानंतर पालकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली, ज्यांनी रविवारी गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली.
आरोपी शाळेनंतर मुलीवर बलात्कार करत असत. तपासादरम्यान पोलिसांना असे आढळून आले की, शाळेनंतर तिला घेण्यासाठी येणारी ऑटो-रिक्षा यायला १५ मिनिटे लागत असत. या वेळेत, तिन्ही आरोपी मुलीला जवळच्या एका पडक्या इमारतीत घेऊन जात आणि तिच्यावर बलात्कार करत. कल्याण सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कल्याण पूर्वात घडलेल्या या घटनांमुळे महिलांच्या आणि लहान मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या मागण्यांवर सरकार कोणती पावले उचलते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Raigad News : मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचे खारपाडा टोलनाका येथे ठिय्या आंदोलन






