फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम
गेल्या काही दिवसांपासून उल्हास नदीच्या पाण्याची गढूळता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पाण्याचा रंग अधिक गडद झाला असून पाण्यात मोठ्या प्रमाणात गाळ येत असल्याने पाण्याचा उपसा करण्यात व त्याचे शुद्धीकरण प्रक्रियेत अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक भागांतील नागरिकांना नळाद्वारे गढूळ पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून उल्हास नदीच्या पाण्याची गढूळता मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने नळाला गडद गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपविभागीय अभियंता सुरेश खाद्री यांनी शनिवारी उल्हास नदीवर बॅरेज येथे असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रावर पाहणी करून गढूळतेचे प्रमाण मोजणाऱ्या यंत्राद्वारे नदीच्या पाण्याची तपासणी केली. यावेळी ते तब्बल ३७० एनटीयूवर (नेफेलोमेट्रिक टर्बिडिटी युनिट) असल्याचे आढळले. पावसाळ्यात नदीच्या तळाशी साचलेला गाळ वर आल्याने साधारणपणे गढूळतेचे प्रमाण १५० ते २०० एनटीयूच्या आसपास असते.
मात्र, यंदा गढूळतेने ही मर्यादा ओलांडली असून गेल्या दहा वर्षातील ही सर्वाधिक गढुळता असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाणीउपसा आणि शुद्धीकरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होत आहेत. पाण्यात मोठ्या प्रमाणात गाळ येत असल्याने दर तीन तासांनी फिल्टर बंद करावे लागत आहे. प्रेशर फिल्टरही चालत नाहीत. त्यामुळे पाण्याच्या फिल्टरेशनची क्षमता कमी झाली आहे.
उल्हास नदी ही माथेरानच्या डोंगरदऱ्यातून उगम पावून कर्जत, वांगणीमार्गे बदलापूर परिसरातून वाहते. बदलापूर शहराचा प्रमुख जलस्रोत असलेल्या या नदीतील गढूळता वाढण्यामागे कर्जत तालुक्यात नदीकाठावर सुरू असलेले डोंगर खोदकाम अथवा अन्य प्रकारचे खोदकाम कारणीभूत असण्याची शक्यता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने व्यक्त केली आहे. खोदकामातील माती व अतिसूक्ष्म कण पावसाच्या पाण्यासोबत नदीत वाहून आल्याने गढूळता वाढली असावी, अशी शक्यता आहे.
बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरांची एकत्रित पाण्याची गरज सुमारे १४० एमएलडी असताना सध्या उल्हास नदीतील वाढलेल्या गढूळतेमुळे केवळ १०५ ते ११० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. गढूळता पूर्णपणे कमी होत नसल्याने काही भागांतील नागरिकांना नळाद्वारे गढूळ पाणी मिळत असल्याच्या तक्रारी आहेत. ही परिस्थिती कायम राहिल्यास आवश्यकतेनुसार एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा पर्याय विचाराधीन असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)






