महिला व अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांवर महिला आयोग गंभीर; मीरा-भाईंदर पोलिसांना नोटीससदृश निर्देश
शिवसेना जिल्हा संघटक निशा नरेश नार्वेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने १५ जून २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे यासंदर्भात निवेदन सादर केले होते. या निवेदनात काशिमीरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गंभीर गुन्ह्याचा उल्लेख करण्यात आला आहे. गुन्हा क्रमांक ०२७८/२०२६ मध्ये गैरअर्जदार राजेश चव्हाण याच्यावर एका अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असून, त्याच्याविरोधात पोक्सो (POCSO) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai : मनसेच्या अल्टिमेटमपूर्वीच नरेंद्र मेहतांनी केला बॉटलनेक ब्रिजचा लोकार्पण सोहळा
निवेदनात नमूद केल्यानुसार, सद्यस्थितीत पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. याशिवाय, मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीतील एका नगरसेविकेकडून आपल्या पदाचा गैरवापर करून पोलीस तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे (भा.प्र.से.) यांनी संबंधित यंत्रणांना कठोर शब्दांत सूचना दिल्या आहेत. मिरा-भाईंदरसारख्या विकसित आणि नागरीकरण झालेल्या परिसरात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनणे आणि गुन्ह्यांच्या तपासावर राजकीय दबाव आणला जाणे ही अत्यंत चिंताजनक बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ मधील कलम १२ अंतर्गत या संपूर्ण प्रकरणात करण्यात आलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल (Action Taken Report – ATR) पुढील दोन आठवड्यांच्या आत आयोगाकडे सादर करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहेत. महिला व बालकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आयोगाने घेतलेल्या या भूमिकेमुळे संबंधित प्रकरणातील तपास प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आयोगाच्या निर्देशांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mira-Bhayandar: अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण रॅकेटचा पर्दाफाश; ८ आरोपी अटकेत, मुख्य सूत्रधार जेरबंद






