अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण रॅकेटचा पर्दाफाश; ८ आरोपी अटकेत, मुख्य सूत्रधार जेरबंद
विजय काते, भाईंदर : अल्पवयीन मुलीला शिक्षण व संगोपनाचे आमिष दाखवून हरियाणातून भाईंदर येथे आणत तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि देहव्यापारासाठी वापरणाऱ्या टोळीचा नवघर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीसह आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून अनैतिक व्यापाराचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. होळीच्या दिवशी, ३ मार्च २०२६ रोजी, सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणारे संजय देवनारायण गुप्ता (वय ५४) यांनी नवघर पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तपासादरम्यान संबंधित मुलगी सापडल्यानंतर तिची महिला पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.
14 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महिला डॉक्टरला दिलासा; उच्च न्यायालयाच्या आदेशाने मिळणार MBBS पदवी
चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. संजय गुप्ता आणि त्यांची पत्नी मधू गुप्ता यांनी मुलीच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीचा फायदा घेत तिला हरियाणातून भाईंदर येथे आणल्याचे निष्पन्न झाले. तिच्या शिक्षणाची व देखभालीची जबाबदारी घेण्याचे आश्वासन देऊन तिला आणल्यानंतर विविध व्यक्तींकडून तिचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला. तपासात आरोपी मधू गुप्ता यांच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे फोटो आणि आर्थिक व्यवहारांचे पुरावे आढळून आले. चौकशीत आरोपी दाम्पत्य त्यांच्या राहत्या घरी देहव्यापार चालवत असल्याचे समोर आले. पीडित मुलीला मसाजच्या नावाखाली ग्राहकांकडे पाठवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचेही उघड झाले.
तसेच डोंबिवली , बदलापूर , कुरार , अंबरनाथ , उत्तरप्रदेश मधील परिसरात काही ग्राहकांना बोलावून पीडितेचा गैरवापर करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात काही ग्राहकांनीही मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी सविलयाप्रसाद श्रीवास्तव उर्फ “एलआयसीवाला” (वय ६१) याने पीडितेचे कौमार्य भंग करण्यासाठी ५० हजार रुपये दिल या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अखेर अटक करण्यात नवघर पोलिसांना यश आले आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील शहागंज येथे गेले होते. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी तेथून फरार झाला.
यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहिती व गुप्त बातमीदारांच्या मदतीने त्याचा सातत्याने पाठलाग केला. आरोपी मालाड ते भाईंदर परिसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान नवघर पोलिसांनी पीडितेला लैंगिक अत्याचारासाठी पुरविणे तसेच तिच्यावर अत्याचार करणाऱ्या एकूण आठ आरोपींना अटक केली आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित अनैतिक मानवी तस्करी व देहव्यापाराचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. या कारवाईमुळे अल्पवयीन मुलींच्या शोषणाशी संबंधित गंभीर गुन्ह्यांवर मोठा आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रकरणाचा पुढील तपास नवघर पोलीस करीत आहेत.
वनविभागाची मोठी कारवाई; राखीव वनक्षेत्रात वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळ्यांचा केला पर्दाफाश






