येत्या 23 नोव्हेंबरला शिक्षकांचीच होणार परीक्षा; TET मध्ये गुरुजींच्या बुद्धीमत्तेचा लागणार कस
मुंबई : शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेवरून राज्यातील शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दिवाळीच्या सुटीनंतर आता शिक्षकवर्ग पुन्हा अभ्यासाला लागला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यरत शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शिक्षक आणि इच्छुक उमेदवार 23 नोव्हेंबरच्या परीक्षेची तयारी करत आहेत.
शाळा संपताच संध्याकाळी ऑनलाईन क्लासेस, टेस्ट सीरीज आणि नोट्स तयार करण्यात त्यांचा दिवस जातो. या परीक्षेचा निकाल भविष्यातील शिक्षक भरतीवर थेट परिणाम करणार असल्याने ‘गुरुजींची परीक्षा’ ही सर्वांसाठीच महत्त्वाची ठरणार आहे. गेल्यावर्षी गडचिरोली जिल्ह्याचा टीईटीचा एकूण निकाल जेमतेमच होता. यावेळी परीक्षाधींची संख्या वाढल्याने निकालाचा टक्का कसा राहतो, याकडे शिक्षण विभागाचे लक्ष लागले आहे.
अनेकांनी यावर्षी अधिक नियोजनबद्ध तयारी सुरू केली आहे. टीईटीनंतर शिक्षकांसाठी पुढचा टप्पा म्हणजे टेट (टीचर अॅप्टिट्यूड अॅण्ड इंटेलिजन्स टेस्ट), ही परीक्षा 8 फेब्रुवारीला घेतली जाणार असून, यावर राज्यातील मोठ्या शिक्षक भरतीचे भवितव्य अवलंबून आहे.
दोन स्तरावर टीईटी परीक्षा
टीईटी परीक्षा दोन स्तरावर घेतली जाणार आहे. यात पेपर २ इयत्ता १ ली ते ५ वी साठी तर पेपर २ इयत्ता ६ वी ते ८ वीसाठी असणार आहे. प्रत्येक पेपर १५० गुणांचा असून, यात नकारात्मक गुणांकन नाही. खुल्या प्रवर्गासाठी किमान ६० टक्के तर राखीव प्रवर्गासाठी ५५ टक्के गुण आवश्यक आहेत. ही पात्रता प्रमाणपत्र स्वरुपात देण्यात येते.
उमेदवारांनाच होता येणार टेटमध्ये सहभागी
दोन्ही परीक्षांचे निकाल मिळूनच शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होईल, असे बोलले जात आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांनाच आता परीक्षेला जावे लागणार असल्याने त्यांच्या बुद्धीमत्तेचा कस लागणार आहे.
हेदेखील वाचा : शिक्षक भरती प्रक्रियेतील अन्याय संपणार तरी कधी? अभियोग्यता धारकांनी व्यक्त केला संताप






