
शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार केला जाईल
सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली. जवळपास ४० मिनिटे चाललेल्या या विस्तृत चर्चेत माळशिरस तालुक्यातील वेळापूरचे विक्रमसिंह माने-देशमुख, निमगावचे निनाद पाटील, किरण पाटील, बालाजी मगर, संदीप माने-देशमुख, राहुल माने-देशमुख, धैर्यशील माने-देशमुख, विराज घारगे-देशमुख, भारत माने-देशमुख, शिवाजीराव माने-देशमुख व विजय मिरगे आदी प्रमुख शेतकरी उपस्थित होते.
बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांनी प्रशासनासमोर आपल्या विविध अडचणी मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने ७/१२ उताऱ्यावर नोंद असणारे ‘पोटखराब क्षेत्र’ आणि प्रत्यक्षात जागेवर असणारे ‘बागायत क्षेत्र’ यातील तफावतीकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले. यावर बोलताना, “प्रत्यक्षातील वस्तुस्थिती जाणून घेऊनच योग्य तो मोबदला दिला जाईल,” असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
Solapur Rain: सोलापूर जिल्ह्यात पावसाची हजेरी; नागरिकांना उकाड्यापासून दिलासा
तसेच, ज्या शेतकऱ्यांची जमीन या महामार्गात संपूर्णपणे संपादित केली जात आहे (पूर्ण बाधित शेतकरी), अशा शेतकऱ्यांना ‘इंटरचेंज’च्या ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. शेतकऱ्यांना मोबदला किती मिळणार, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहत योग्य व न्याय्य मोबदला देण्याचे आश्वासित केले.
”माळशिरस तालुक्यातील १२ गावांतील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार आहेत, त्यांच्याशी मी स्वतः माळशिरस येथे स्वतंत्र बैठक घेऊन संवाद साधणार आहे. त्यांच्या सर्व अडीअडचणी प्रत्यक्ष सोडविल्या जातील. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अनाठायी अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले.