'गोकुळ'च्या थकीत ऊस बिलासाठी संघर्ष तीव्र
सोलापूर शहर प्रतिनिधी: ‘गोकुळ शुगर’ (धोत्री) कडील थकीत ऊस बिल मिळावे, या प्रमुख मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आता संघर्षाची तीव्रता वाढवत १० जून २०२६ रोजी सामूहिक ‘जलसमाधी’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.
‘गोकुळ थकीत ऊस बील शेतकरी व शेतकरी संघर्ष समिती, तुळजापूर व अक्कलकोट’ यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी लेखी निवेदन सादर करण्यात आले. त्यामध्ये बुधवार, १० जून रोजी दुपारी १२ वाजता विजापूर रोडवरील ऐतिहासिक कंबर तलाव येथे सामूहिक ‘जलसमाधी’ आंदोलन करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून पूनम गेट येथे शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ४ जून रोजी सहप्रादेशिक साखर विभाग, सोलापूर कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ‘अर्धनग्न’ आंदोलनही केले होते. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
प्रस्तावित आंदोलनाची सुरुवात पूनम गेट येथून होणार असून रंगभवन, सातरस्ता, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, विजापूर रोड मार्गे मोर्चा कंबर तलावाकडे जाणार आहे. या आंदोलनात तुळजापूर आणि अक्कलकोट परिसरातील सुमारे ५०० शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या निवेदनावर अरविंद घोडके, अमोल पाटील, मिलिंद पाटील, खंडू कचरे, नामदेव महाबोटे यांच्यासह अन्य शेतकरी प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत. ‘आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास उद्भवणाऱ्या कोणत्याही अनुचित परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील,’ असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घामाचे मोल अद्याप मिळाले नसल्याने आता त्यांच्या संयमाचा बांध फुटला असून, १० जूनचे आंदोलन प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.






