फोटो सौजन्य - Social Media
कराड येथील कृष्णाकाठचे भाग्यविधाते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त कृष्णा विश्व विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘कृष्णा मॅरेथॉन’ला प्रचंड प्रतिसाद लाभला. निरोगी आरोग्य आणि तंदुरुस्त जीवनशैलीचा संदेश देणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये सुमारे २००० हून अधिक स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सकाळी सहा वाजता कृष्णा रुग्णालयाच्या प्रांगणातून या मॅरेथॉनला सुरुवात झाली. कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले आणि कृष्णा औद्योगिक महिला संस्थेच्या संस्थापिका सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते ध्वज दाखवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
५ किलोमीटर आणि १० किलोमीटर अशा दोन गटांमध्ये ही मॅरेथॉन पार पडली. विविध वयोगटांत पुरुष व महिला स्पर्धकांनी सहभाग घेतल्याने मॅरेथॉन अधिक रंगतदार ठरली. ५ किमी अंतराच्या १८ वर्षांखालील पुरुष गटात गणराज, अलंकार पोळ आणि हर्षवर्धन पुजारी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला, तर महिला गटात श्रेया गोंदाल, जान्हवी पाटील आणि अनुश्री काळे यांनी बाजी मारली. १९ ते ३५ वयोगटातील पुरुषांमध्ये दीपक सवाखंडे, पवन कुंभार आणि अवधूत शिवणीकर यांनी, तर महिलांमध्ये सकिना इद्रासी, कल्याणी थोरात आणि शिवानी भणगे यांनी विजेतेपद मिळवले. ३६ ते ४५, ४६ ते ५५ आणि ५५ वर्षांवरील गटांमध्येही स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रेक्षकांची दाद मिळवली.
१० किमी अंतराच्या स्पर्धेतही स्पर्धकांनी मोठ्या जोमाने धाव घेतली. १८ वर्षांखालील गटात शुभम पाटील, प्रथमेश भोसले आणि ओंकार यांनी पुरुष गटात, तर रितिका मोहिते, आर्या देशमुख आणि अवनी चव्हाण यांनी महिला गटात यश संपादन केले. १९ ते ३५ वयोगटातील पुरुषांमध्ये रतन धामी, वेदांत सुतार आणि वैभव बेंद्रे यांनी, तर महिलांमध्ये जान्हवी पाटील, सानिका साबीर आणि अनुषा रावत यांनी अव्वल क्रमांक पटकावले. इतर वयोगटांमध्येही स्पर्धकांनी उत्कृष्ट कामगिरी करत मॅरेथॉन यशस्वी केली.
विजेत्या स्पर्धकांना डॉ. सुरेश भोसले आणि सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते पदके व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दरवर्षी कृष्णा मॅरेथॉन अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्याचा मानस व्यक्त करत, पुढील वर्षापासून २१ किमी रनिंग ट्रॅकचा समावेश करण्यात येणार असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले. यामुळे या मॅरेथॉनला ऐतिहासिक ओळख मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात कराडच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चमक दाखवलेल्या क्रीडापटूंनाही विशेष सन्मान देण्यात आला. सूत्रसंचालन अजीम कागदी यांनी केले, तर मधुरा राऊत आणि अभिजीत पाटील यांनी सादर केलेल्या झुम्बा नृत्याने उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मॅरेथॉनला यशस्वी केले.






