पराभवाच्या भितीने नरेंद्र मोदी हिंदु-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा करत धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत इंडिया आघाडीकडे जनतेचा कौल असल्याचे स्पष्ट दिसत आहे. देशात व राज्यातही परिवर्तन करण्याची जनतेची भावना आहे. नरेंद्र मोदी व भाजपाला जनतेचा कौल लक्षात आला असून, पराभव होणार व आपली खुर्ची जाणार या भितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषेचा स्तर खालावला आहे. पराभवाच्या भितीने नरेंद्र मोदी हिंदु-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा करत धार्मिक तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्लाबोल काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केला आहे.
चेन्नीथला पुढे म्हणाले की, जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मोदी सरकारने १० वर्षात काहीही काम केले नाही. आता लोकांना सांगण्यासारखे काही नसल्याने मोदी धार्मित तेढ वाढवण्याची भाषा करत आहेत. दक्षिण भारत वेगळा देश करण्याची मागणी केली जात असल्याचे पंतप्रधान जाहीरपणे सांगतात, अशी मागणी कोणीही केलेली नाही, मग मोदींना हे कोणी सांगितले? ते केवळ लोकांना भडकावण्याचे काम करत आहेत परंतु जनतेवर त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. विरोधी पक्षांच्या नेत्यांबद्दलही नरेंद्र मोदी खालच्या पातळीवरची भाषा बोलत आहेत. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांबद्दल मोदींनी वापरलेली भाषा चुकीची असून, पंतप्रधान पदावरील व्यक्तीला ते शोभत नाही. जनतेचा मोदी सरकारवर विश्वास राहिला नसून काँग्रेसच्या जाहिरनाम्याला जनतेचे समर्थन मिळत आहे. काँग्रेस पक्षाने न्यायपत्रात दिलेल्या गॅरंटीवर जनता विश्वास व्यक्त करत आहे. देशभरात इंडिया आघाडीला अनुकूल वातावरण असून लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी विजयी होईल, असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांच्या राजीनाम्यावर बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, नसीन खान यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना पत्र लिहिले होते त्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्यात आली. नसीम खान यांनी पुण्यात राहुल गांधी यांचीही भेट घेतली. काँग्रेसमध्ये विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, पक्षात लोकशाही आहे. काँग्रेस सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. नसीम खान व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेला राजीनामा परत घेतला असून ते प्रचारात सक्रीय होतील, असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान म्हणाले की, अल्पसंख्याक समाज, उत्तर भारतीय समाजाची भावना मी अखिल भारतीय काँग्रेसला कळवली होती, माझ्या पत्राची पक्षाध्यक्ष मल्लीकार्जून खर्गे, राहुल गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी दखल घेतली. समाजाच्या वतीने मी काही मुद्दे मांडले होते, येणाऱ्या काळात त्यावर पक्ष योग्य तो निर्णय घेईल. मी पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता असून, राहुल गांधी व मल्लिकार्जून खर्गे यांच्या लढाईत मजबूतपणे सहभागी होत इंडिया आघाडीचा पंतप्रधान व्हावा यासाठी काम करणार, असे नसीम खान यांनी स्पष्ट केले आहे. आपली कोणतीही नाराजी नसून, उत्तर मध्य मुंबई मतदार संघातील इंडिया आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड या दोन लाख मतांनी विजयी होतील, असा विश्वासही नसीम खान यांनी व्यक्त केला.
Web Title: The language of hindu muslim and pakistan in narendra modis mouth for fear of defeat attack by ramesh chennithala nrdm