मुंबई – बंडखोर आमदारांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे सूडापोटी पोलिस संरक्षण काढल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. यासंबंधीचे पत्रही त्यांनी ट्विटरवर शेअर केले होते. यावर आता महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी खुलासा केला आहे. कोणत्याही आमदाराची सुरक्षा काढलेली नसल्याचे म्हणत त्यांनी शिंदेंचे आरोप फेटाळले आहेत.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी केलेले आरोप चुकीचे आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था राखणे आमची जबाबदारी आहे. कुठल्याही आमदारांचे संरक्षण काढलेले नाही. पोलिस नियमाप्रमाणे अलर्ट आहेत. परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. पोलिस दलातल्या अधिकाऱ्यांना काम करताना काही नियम, जबबादारी असते. ती जबाबदारी त्यांची आहे. ती जबाबदारी पार पाडली की नाही, याचा आढावा अधिकारी घेतील.
वळसे-पाटील म्हणाले की, आमचे सरकार बहुमतात आहे. सरकार अल्मपतात नाही. त्यामुळे सरकारला निर्णय घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही. त्यामुळे त्यानुसार आमचे काम सुरू आहे. शिंदे गट येथे येऊन आपण शिवसेनेचे आमदार आहोत, हे सिद्ध करू शकणार नाहीत. नियम अतिशय स्पष्ट आहेत. त्यांच्याकडे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नाही. बंडखोर आमदारांचे काय चालले मला माहिती नाही. विधानसभा अध्यक्षांसमोर तो प्रस्ताव आला. त्यानुसार ते नियमानुसार निर्णय घेतील.