आषाढी वारीत युवकणधा वाढता सहभाग (फोटो- वैष्णवी सुळाके)
पुणे/वैष्णवी सुळाके: पंढरपूरच्या दिशेने चाललेल्या आषाढी वारीला यंदा एक वेगळीच ऊर्जा लाभली आहे. ती म्हणजे नव्या पिढीचा उत्स्फूर्त सहभाग. पारंपरिक भक्तिरसात चिंब भिजलेल्या या वारीत यंदा शेकडो तरुण–तरुणी ‘माझा विठ्ठल, माझी वारी’ म्हणत तन-मनाने सामील झाले आहेत. केवळ चालण्यापुरता हा प्रवास नाही. तरुणांच्या पावलांमध्ये सामाजिक जाणिवांचा, पर्यावरण जागरूकतेचा आणि सेवाभावाचा ठसा उमटताना दिसतो आहे. तरुणांनी आपली जीवनशैली, स्वप्ने आणि श्रद्धा यांचा संगम करून परंपरागत वारीला नव्याने आकार दिला आहे.
पुण्यातील आय टी, वैद्यकीय, कला आणि शिक्षण क्षेत्रातील तरुणांनी पालखी सोहळ्यात आपले योगदान प्रामाणिकपणे दिले. कुणी सोशल मीडियावरून वारीचा अनुभव जगासमोर मांडतो आहे, तर कुणी वारी मार्गावर रस्ते स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी उचलतो आहे.
या वारीत त्यांच्यासाठी कोणताही दिखावा नाही, प्रसिद्धीची हाव नाही आहे ती केवळ माऊलीचे नामस्मरण, संतांच्या विचारांशी एकरूप होण्याची तळमळ. ‘तुका म्हणे ध्यानाची ठेवावी ध्यानें | विठोबा नाम घेता अंतःकरणें…’ या संतवचनांचा अनुभव या तरुणांच्या कृतीतून प्रत्ययास येतो.
तरुण वारकऱ्यांचा सहभाग हा केवळ वारीचा बदलता चेहरा नाही, तर ही आपल्या संस्कृतीची पुनर्भेट आहे. वारीत त्यांचं चालणं म्हणजे एका नव्या अध्यात्मिक चैतन्याचा प्रसार आहे. आजच्या धकाधकीच्या युगातही श्रद्धेची आणि सेवाभावाची ज्योत तेवत ठेवणारी ही तरुणाई, वारीच्या वाटेवरून चालतच नव्हे तर समाजमनातही अध्यात्माचा नवा मार्ग शोधत आहे. या पवित्र वारीत सहभागी होणं म्हणजे केवळ पंढरपूरला जाणं नाही, तर स्वतःच्या अंतर्यामीच्या विठ्ठलाला जागं करणं. म्हणूनच, या तरुणांनी आपल्या पायवाटेने, प्रेमाने आणि सेवाभावाने संपूर्ण वारीला एक नवा अध्यात्मिक अर्थ दिला आहे.
माझी विठ्ठलावर खूप भक्ती आणि श्रद्धा आहे. गेल्या 6 वर्षांपासून मी पायी वारी करत आहे. वारीच्या माध्यामातून परमेश्वराची साक्षात भेट होते. वारीला जाणे म्हणजे स्वर्ग सुख आहे. यामाध्यमातून इतरांच्या सुख-दुःखात सहभागी होता येते.
– हर्ष गरुड, पुणे
वारी मला शिकवते की नम्रता म्हणजे खरी भक्ती. हजारो लोकांमध्ये चालताना आपण एक सामान्य वारकरी होतो, पण विठ्ठलाच्या दृष्टीने आपण सगळेच प्रिय असतो हीच अनुभूती मला दर वारीत मिळते. त्यामुळेच 3 वर्षांपासून मी वारीत चालतो आणि यापुढेही जात राहीन.
– तुषार कोल्हे, नाशिक
23 वर्षांपासून मी अखंडित पायी वारी करतोय. लहानपणापासूनच आजी-आजोबा मला घेवून जायचे. मला वारीतील चैतन्य मनाला हवेहवेसे वाटते. माऊलींच्या नामात इतकं समाधान आहे, की जगातल्या कोणत्याही गोष्टीची हाव उरत नाही. हे समाधान मला मिळते.
– बाळासाहेब धुमाळ, अकोला
आयुष्यात एकदातरी वारी करायची हे माझे ठरले होते. त्यामुळे मी यंदा पायी वारी करत आहे. टाळ, मृदंगाच्या गजरात तल्लीन झालेले वारकरी नव्या ऊर्जेने ह्या सोहळ्यात दंग होतात. सर्व दुःख बाजूला सारून माऊलींचा गजर करतात. ही खूप मोठी ताकद आहे. त्यामुळे हा सर्व सोहळा, भक्तिमय वातावरण अनुभवण्यासाठी मी पायी वारी करत आहे.
-प्रियांका दिघोळे, परभणी
माझे पायी वारीचे हे तिसरे वर्ष आहे. विठू-माऊलीवर माझी खूप श्रद्धा आणि विश्वास आहे. त्यामुळे मी वारीला जातो. वारी म्हणजे माझ्यासाठी आत्मशोधाचा प्रवास आहे.
– मंगेश दरवडे, सोलापूर