Photo : Youth Kidnapped
शिक्रापूर : वाडागाव (ता.शिरुर) येथील तिघा लहान बालकांचे एका युवकाने अपहरण करुन एका बालिकेचा खून केला. त्यानंतर मृतदेह विहिरीमध्ये फेकून दिल्याची हृदयद्रावक घटना घडल्याने शिरुर तालुक्यात खळबळ उडाली. शिक्रापूर पोलिसांनी दोघा बालकांची सुटका करत आरोपीला ताब्यात घेतले असून, गायत्री रणजीतकुमार रविदास असे खून झालेल्या बालिकेचे तर बबन रामपीर यादव असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वाडागाव (ता.शिरुर) येथील गायत्री रविदास (वय 7) व कार्तिक रविदास आणि अभिजित पासवान (दोघे वय 3) हे तिघे बालके शनिवारी (दि.२२) बेपत्ता झाल्याची घटना घडली. असे असताना विनादेवी रणजीतकुमार रविदास या महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात इसमावर अपहरणप्रकरणी गुन्हे दाखल करत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांसह आदींनी बालकांचा शोध सुरु करत परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता बबन यादव हा त्याच्याजवळील दुचाकीहून तिघा बालकांना घेऊन गेल्याचे समोर आले.
त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासात थेट खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव गाठले. त्यानंतर सदर ठिकाणहून बहुल गावातून बबन हा तिघांपैकी दोघा बालकांना पुन्हा शिक्रापूर दिशेने येताना दिसले. त्यानंतर काही वेळात दोन बालके पोलिसांना रस्त्यावर मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत बबनचा शोध घेतला असता रात्रीच्या सुमारास पोलिसांनी बबन रामपीर यादव (रा. कल्याणी फाटा कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे) याला ताब्यात घेतले असता त्याने बहुळ गावातील एका विहिरीमध्ये गायत्रीला टाकून दिल्याचे सांगितले. त्यानंतर शिक्रापूर, शिरुर, रांजणगाव पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी सदर ठिकाणी शोध घेतला.
दरम्यान, पुणे महानगर प्रादेशिक परिवहन विभागाचे अग्निशामक विभागाचे अग्निशमन अधिकारी प्रकाश मदने, महेश पाटील, प्रशांत अडसूळ यांच्यासह इतरांनी पोलिसांच्या उपस्थितीत गावातील सदर विहिरीमध्ये शोध घेतला. त्यावेळी अथक प्रयत्नानंतर सदर पथकाला गायत्री रणजीत कुमार रविदास (वय ७, रा. वाडागाव ता. शिरूर जि. पुणे, मूळ रा. झारखंड) या मालिकेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले.
अनैतिक संबंधांना विरोध म्हणून अपहरण अन्…
वाडागाव येथून अपहरण झालेली तीनही बालकांचे कुटुंबीय व आरोपी हे परप्रांतिय असून, मृत गायत्रीच्या मावशीसोबत आरोपीचे अनैतिक संबंध होते. मात्र, त्याला गायत्रीची आई आणि इतर कुटुंबीयांचा विरोध असल्याने या सर्वांना धडा शिकवायचा म्हणून तीनही बालकांचे आपण अपहरण केल्याचे आणि गायत्रीला विहिरीत टाकल्याचे आरोपीने पोलिसांना प्राथमिक तपासात सांगितले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.