पर्यटकांसाठी आनंदाची बातमी ! महाबळेश्वर पर्यटन महोत्सव 2025 साठी टोलमाफी जाहीर मात्र एका अटीवर
सातारा/ दत्तात्रय पवार: पश्चिम महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं महाबळेश्वर नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असतं. या निसर्गाच्या विविध रंगांनी नटलेलं हे पर्यटनस्थळ वर्षभर पर्यटकांनी गजबजलेलं असतं. आता या रम्य स्थळाला भेट देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाबळेश्वर पर्यटन महोत्सव 2025 दरम्यान येणाऱ्या पर्यटकांना टोलमाफी मिळणार आहे ! मात्र, त्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. काय आहे ती अट? चला जाणून घेऊया.
वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी मोठा निर्णय घेत महोत्सवाच्या निमित्ताने महाबळेश्वरकडे येणाऱ्या पर्यटकांसाठी 2 ते 4 मे या तीन दिवसांच्या कालावधीत टोलमाफी जाहीर केली आहे. हे तीन दिवस महाबळेश्वरमध्ये एक नवा उत्सव, एक नवा अनुभव देणार आहेत.
या तीन दिवसीय महोत्सवाची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. याचं उद्घाटन एक शानदार सोहळा ठरणार असून, त्यानंतर महाबळेश्वरमध्ये संस्कृती, चव आणि साहस यांचा अविस्मरणीय संगम पाहायला मिळणार आहे.
3 मे रोजी “साबणे रस्ता” येथे भव्य संस्कृतिक मिरवणूक आणि खाद्यसंस्कृतीचा अनोखा जलवा पाहायला मिळेल.
4 मे ला पारंपरिक लोककला, नृत्य, आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सवाचा समारोप होईल. कच्छ महोत्सवाच्या धर्तीवर उभारले जाणारे १०० हून अधिक तंबू, वेण्णा तलावात नौकाविहार, साहसी जलक्रीडा, अशा साऱ्या गोष्टी पर्यटकांचा अनुभव अविस्मरणीय करणार आहेत.
टोलमाफी फक्त पर्यटन महोत्सवासाठी महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांसाठी आहे. स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी, स्थानिक वाहतूक किंवा इतर कामांसाठी होणारी ये-जा या सवलतीत धरली जाणार नाही. म्हणजेच – फक्त महोत्सवासाठी महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांना टोलमाफीचा लाभ घेता येणार आहे !
मंगळवेढा तालुक्यात जुगार अड्ड्यावर धाड, 18 जणांवर गुन्हा दाखल; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
मुंबई, पुणे, सातारा आणि इतर भागांतून हजारोंच्या संख्येने पर्यटक या महोत्सवासाठी महाबळेश्वरच्या दिशेने रवाना होण्यास सज्ज आहेत. टोलमाफीचा लाभ घेत एक नवा अनुभव घेण्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
या भव्य महोत्सवाच्या माध्यमातून महाबळेश्वर केवळ थंड हवामानाचं ठिकाण न राहता, राज्याच्या पर्यटन नकाशावर एक ‘आयकॉनिक डेस्टिनेशन’ म्हणून उभं राहतंय. प्रशासन, स्थानिक यंत्रणा आणि राज्य सरकार यांचा समन्वयातून हा महोत्सव पर्यटनाला नवी दिशा देणार, हे निश्चित !