राज्य सरकारकडून वारकऱ्यांसाठी टोलमाफी जाहीर; 'या' कालावधीत मिळणार टोलमधून सूट
महाबळेश्वर : पर्यटन विभागाच्या वतीने 2 ते 4 मे दरम्यान होत असलेल्या महापर्यटन उत्सवात सहभागी होत असलेल्या पर्यटकांना प्रवेशकर व वाहनतळ फी माफ करण्यात आल्याची माहिती वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कच्चरे यांनी महाबळेश्वर येथे दिली. यावेळी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे वरीष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंतराव हेडे, तहसीलदार तेजस्विनी पाटील, पालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी अजय देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाबळेश्वर या पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणावर पर्यटक यावा, यासाठी पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांच्या संकल्पनेतून महाबळेश्वर येथे 2 ते 4 मे या दरम्यान तीन दिवसीय महापर्यटन उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या पर्यटन उत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. या महा पर्यटन उत्सवाची शासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे.
तब्बल 20 ते 22 वर्षांनी होत असलेला हा पर्यटन उत्सव यशस्वी व्हावा, यासाठी याची संपूर्ण जबाबदारी संभाजीनगर येथील ई-फॅक्टर या खाजगी इव्हेंट कंपनीला देण्यात आली. या उत्सवातील कार्यक्रमाचे सादरीकरणासाठी शहरातील प्रमुख पदाधिकारी व नागरीकांची एक बैठक वाई प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या अध्यक्षतेखाली येथील मधुबनच्या सभागृहात अयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी टोल माफ करण्यात आल्याची माहिती दिली.
यावेळी उपस्थित नागरीकांशी संवाद साधताना राजेंद्र कचरे म्हणाले की, ‘हा महापर्यटन उत्सव स्थानिक नागरीकांच्या सहकार्याशिवाय यशस्वी होणार नाही. म्हणून या उत्सवाची संपूर्ण माहिती देणे व त्याबाबत नागरिकांची मते जाणून घेणे व कार्यक्रमात आवश्यक ते बदल करण्यासाठी आजची ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागरिकांनी केलेल्या प्रत्येक सूचनेचे आम्ही स्वागत करतो, असे स्पष्ट करून कचरे यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली.
महापर्यटन उत्सवाची माहिती सर्वदूर पोहोचविण्यासाठी सर्वच मार्गाचा अवलंब करण्यात येणार आहे. रेडिओ, टीव्ही, वर्तमानपत्र या बरोबरच सोशल मीडिया यांचाही वापर करण्यात येणार आहे. टॅक्सी व लक्झरी बसेसवर जाहिरात करणारे स्टिकर्स लावण्यात येतील. शहरातील प्रत्येक प्रवेशव्दारावर मोठमोठ्या कमानी उभारल्या जातील. त्याचप्रमाणे मुंबई-बंगलोर व मुंबई-गोवा या महामार्गावर होर्डिंग्ज लावले जातील. हॉटेलमधील स्वागत कक्षात उत्सवाची कार्यक्रम पत्रिका लावली जाईल, तीन दिवस आलेल्या पर्यटकांना एक कीट देण्यात येईल, असेही सांगण्यात आले.