संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांची (Accident on Samruddhi Mahamarg) मालिका सुरू असल्याचे दिसत आहे. त्यात आता छत्रपती संभाजीनगरच्या सावंगीजवळ समृद्धी महामार्गावर ट्रक आणि खासगी ट्रॅव्हल्स या दोन वाहनांमध्ये (Accident Between Two Vehicle) भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये ट्रॅव्हल्सच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चुराडा झाला.
समृद्धी महामार्गावर गेट नंबर 16 वर खुराणा ट्रॅव्हल्सने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याची माहिती आहे. रात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील जखमींना तातडीने छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी व मेडिकोर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बुलडाणा येथे समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये बसने पेट घेतल्याने 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा याच समृद्धी महामार्गावर आणखी एका ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे.
कोणतीही जीवितहानी नाही
सावंगी येथे झालेल्या या अपघातात 20 प्रवासी जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. यातील जखमी प्रवाशांना तातडीने छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी व मेडिकोर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती दिली जात आहे.