योगेश कदमांचा ताफा अडवल्याने तृप्ती देसाई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे (फोटो - सोशल मीडिया)
पुणे : पुण्यामधील मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या स्वारगेट बसस्थानकामध्ये मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वारगेटमधील पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये नराधमाने फसवून 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केला. यामुळे पुण्यासह राज्यभरामध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे महिला सुरक्षेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेच्या विरोधात विरोधकांनी जोरदार आंदोलन करत आवाज उठवला आहे. काल (दि.26) ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी आंदोलन केले. त्याचबरोबर शरद पवार गटाच्या नेत्यांनी स्वारगेट चौकात घोषणाबाजी करुन आंदोलन केले आहे. त्याचबरोबर या घटनेच्या निषेधार्थ तृप्ती देसाई यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
स्वारगेट बसस्थानकाच्या आवारामध्ये मोडकळीस आलेल्या बसेसमध्ये धक्कादायक घटना घडल्या असल्याचे पुरावे हाती आले आहेत. यामुळे स्वारगेट आगारामध्ये अवैध धंदे आणि अत्याचार प्रकरण सुरु असल्याचे दिसून आले आहेत. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी स्वारगेट बसस्थानक आवारामध्ये मागील अनेक वर्षांपासून हे प्रकार सुरु असल्याचा आरोप केला आहे. यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यावर ताशेरे ओढले जात आहेत. दरम्यान, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकांची पाहणी केली आहे. तसेच योगेश कदम यांनी आढावा घेत सूचना देखील दिल्या आहेत. मात्र आता घटना घडल्यानंतर कोणता आढावा घेण्यासाठी आले असल्याचा प्रश्न विचारत तृप्ती देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तृप्ती देसाई यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तृप्ती देसाई यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
काय म्हणाल्या तृप्ती देसाई?
पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणावरुन तृप्ती देसाई यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी पुणे पोलीस आणि महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. याबाबत मत व्यक्त करताना तृप्ती देसाई म्हणाल्या की, महाराष्ट्रातले सर्वात मोठे बस स्थानक आहे. एसटीमध्ये महिलांना 50 टक्के तिकीट असतं आणि म्हणूनच महिलांचा टक्का एसटीमध्ये प्रवास करण्याचा वाढलेला आहे. सरकारची ही यंत्राणा असल्यामुळे महिला जास्त एसटीने प्रवास करतात. परंतु स्वारगेटमध्ये जी काही घटना घडली ती भयंकर आहेच, भयानक आहे हा प्रकार. आरोपी 48 तास उलटून गेले तरी पोलिसांना सापडत नाही. पोलिस नेमकं काय करत आहेत?महिलांच्या अब्रूची लक्तर पुण्यात वेशीवर टांगण्यात आलेली आहे. आज कॅब चालकाचे प्रकरणा आहे, तिथे देखील महिलेला कॅब मधून उडी मारावी लागली. असे अनेक प्रकार राज्यात होत आहेत, असा घणाघात तृप्ती देसाई यांनी केला आहे.