स्वारगेट अत्याचार प्रकरणावर खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया (फोटो- सोशल मीडिया)
मुंबई : पुण्यामधील मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या स्वारगेट बसस्थानकामध्ये मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वारगेटमधील पार्क केलेल्या शिवशाही बसमध्ये नराधमाने फसवून 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केला. यामुळे पुण्यासह राज्यभरामध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे महिला सुरक्षेवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या घटनेच्या विरोधात विरोधकांनी जोरदार आंदोलन करत आवाज उठवला आहे. काल (दि.26) ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी आंदोलन केले. त्याचबरोबर शरद पवार गटाच्या नेत्यांनी स्वारगेट चौकात घोषणाबाजी करुन आंदोलन केले आहे. यानंतर आता ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणावरुन रोष व्यक्त केला असून महायुती सरकारला घेरले आहे.
खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पुण्यातील अत्याचार प्रकरणावरुन त्यांनी महायुती सरकारला घेरले आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात गेल्या अडीच ते तीन वर्षापासून महिला अत्याचारांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. महिलांचे अपहरण खून बलात्कार प्रकरण वाढले आहेत. सत्ताधारी पक्षातल्या महिला नेत्या आता काय करत आहेत? पुण्यात जो घृणास्पद प्रकार घडला त्यानंतर महिला नेत्यांनी थातूरमातूर भाष्य केलं. जर दुसरं सरकार असतं तर या महिलांनी मंत्रालयाच्या दारामध्ये गोंधळ घातला असता. एका महिलेवर जी लाडकी बहीण आहे तुमची तिला पंधराशे रुपये दिले म्हणून तुम्ही तिची अब्रू विकत घेतली का? गुंडांना महिलांचं वस्त्रहरण करण्याचं लायसन दिलं आहे का? पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी विचारले पाहिजे पुण्याच्या पोलीस आयुक्तांना जाब विचारला पाहिजे, त्यांच्या काळात गुंडगिरी वाढली आहे. गुंडांना पोलीस ठाण्यात बसवायची नाटक चालली आहे, ते बंद करा, अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे खासदार राऊत म्हणाले की, “पुण्यात सर्वात जास्त खंडणीखोरी, पोलिसांची हप्तेगिरी, अपहरण, राजकीय आश्रयाखाली जी गुंडगिरी सुरू आहे त्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे आश्रय दाते त्यांना अभय आहे. पोलिसांवर दबाव आहे आणि पोलीस तो दबाव मान्य करतात. काल जो पुण्यात प्रकार झाला तो निर्भया कांड सारखा आहे, सुदैवाने त्या मुलीचे प्राण वाचले. स्वारगेटला आमच्या शिवसैनिकांनी प्रखर आंदोलन केलं, त्यांच्यावरती आता गुन्हे दाखल होतील. माझे पोलीस आयुक्तांना आव्हान आहे पुण्यामध्ये मोकाट सुटलेल्या गॅंग त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही. राजकीय कार्यासाठी आपण गृहखात वापरत आहात. सर्वसामान्यांना त्रास देण्यासाठी गृहखात्यात वापरलं जात आहे,” अशी गंभीर टीका खासदार संजय राऊत यांनी गृहखातं आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
बस डेपोची अवस्था काय आहे?
खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, “आमच्या काळात हा शक्ती कायदा आम्ही तयार केला. महिलांना संरक्षण मिळावं आणि महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन मिळावं. पण सरकार का हा कायदा पुढे नेत नाही? हे एक रहस्य आहे. आत मध्ये कोणी फिक्सर बसलेले आहेत का? हा कायदा येऊ नये म्हणून. शक्ती कायदा आल्यामुळे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महिलांचे कोण आणि अत्याचार करून जे लोक बसलेले आहेत, पूजा चव्हाण प्रकरणातले त्यांच्यापर्यंत या कायद्याचे हात पोहोचतील का? म्हणून कोणाला भीती वाटते का? हे पहावं लागेल. ॲक्शन मोड ही वरवरची नाटकं असतात. दुर्घटना घडलेली आहे. महिलेवर अत्याचार झालेला आहे. बलात्कार झाल्यावर ती ॲक्शन मोड करता का तोपर्यंत तुम्ही काय करता बस डेपोची अवस्था काय आहे? ते जाऊन पहा. तुम्ही महागड्या मर्सिडीज मधून फिरता, तुम्हाला कोण देतं ते माहीत नाही. एकही मंत्री सरकारी गाडीतून फिरतो का? सगळ्यांच्या गाड्या ऑडी, मर्सिडीज, बीएमडब्ल्यू आहेत. कोणी दिल्या तुम्हाला या गाड्या? कोणाच्या पैशातून आल्या? आणि सामान्य जनता ज्या एसटीतून फिरते जिथे शिवशाही आहे, त्यात बलात्कार हत्या आणि खून होत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे,” अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.