मनसे नेते संदीप देशपांडे (Sandip deshpande) यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणी दोन जणांना गुन्हे अन्वेषण विभागाने (Crime Branch) अटक केली आहे. या दोन जणांना भांडूपमधून ताब्यात घेण्यात आल्याची माहीती समोर आली आहे. संदीप देशपांडे यांच्यावर काल दादरच्या शिवाजी पार्कात हल्ला झाला होता.
[read_also content=”बिनधास्त होऊ द्या होळी! महिलांच्या सुरक्षेसाठी बाउन्सर, हेल्पलाइन क्रंमाक, पुण्यात होळी पार्टीसाठी पोलीस प्रशासनाची नियमावली https://www.navarashtra.com/maharashtra/to-make-holi-safe-for-women-in-pune-there-will-be-bouncers-present-at-the-holi-party-nrps-373868.html”]
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे काल शिवाजी पार्कवर नेहमी प्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी निघाले असता त्यांच्यावर काही अज्ञातांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. क्रिकेट खेळताना जे स्टम्प्स वापरतात त्याद्वारे देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. या चारही इसमांनी आपला चेहरा कपड्याने झाकला होता. काही कळायच्या आत त्यांनी संदीप देशपांडेवर हल्ला केला.स्टम्प आणि बॅटने त्यांना मारहाण करत हल्लेखोर पळून गेले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती पोलिसांना देताच शिवाजी पार्क पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला होता
संदीप देशपांडे यांच्यावर चार जणांनी हल्ला करत मारहाण केली होती. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असुन दोन जणांना ताब्यात घेतलं आहे तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे. हल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं असुन मनसे नेत्यांनी हल्ल्याप्रकरणी थेट युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊतांच्या चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान, काल झालेल्या हल्ल्याच्या घटनेनंतर आज मनसे नेते संदीप देशपांडे पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी ते काल झालेल्या हल्ला प्रकरणाबद्दल बोलणार असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्लामुळे अनेक आरोप प्रत्यारोप होत असुन संदीप देशपांडे नेमकं काय बोलणार? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.