लातूरमध्ये दोन भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू, पोलिस कर्मचारीही जखमी (फोटो- istockphoto/सोशल मिडिया)
लातूर : लातूर-नांदेड महामार्गावरील तालुक्यातील घरणी येथे दोन दुचाकीच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. दुसरी घटना लातूर शहरातील बारा नंबर पाटी येथील उड्डाणपुलावर ट्रॅक्टर व ऑटोचा अपघात होऊन तिघे ठार झाले. त्यात एक महिला, मुलगी व पुरुषाचा समावेश आहे. या घटनेतील मृतांची ओळख पटविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या दोन्ही घटनांत सहा जण ठार झाले असून, एकजण जखमी झाला आहे.
घरणी येथील यशोदाबाई शिंदे यांना शिरूर ताजंबद येथे उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी त्यांचा मुलगा विठ्ठल शिंदे व जावई लाला पवार हे निघाले होते. त्यावेळी लातूरहून भरधाव वेगाने येत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकीने पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे तिघांच्या डोक्याला मार लागला. यात त्यांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे घरणी गावावर शोककळा पसरली आहे. ही घटना सोमवारी सकाळी 10.30 वाजता घडली आहे. लातूर-नांदेड महामार्गावर घरणी येथील उड्डाण पुलाजवळ (क्र. एम. एच. २४/बी. क्यू. ६८३७) व (क्र. एम. एच. २६/ बी. एन. ७०७२) क्रमांकाच्या दुचाकीमध्ये अपघात झाला.
दरम्यान, या अपघातात पोलिस कर्मचारी ज्ञानेश्वर पांचाळ हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. पांचाळ हे नांदेड पोलिस दलात कार्यरत असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक पंकज निळकंठे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अंतराम केंद्रे, पोलिस हवालदार योगेश मरपल्ले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.