मुंबई विमानतळावरून २ दहशतवाद्यांना अटक (फोटो सौजन्य - pinterest)
मुंबई : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मुंबई विमानतळावर दोन फरार इसिस स्लीपर सेल सदस्यांना अटक केली आहे. 2023 मध्ये पुणे येथे आयईडी बनवण्याच्या आणि चाचणी करण्याच्या प्रकरणात हे दोघेही वाँटेड होते. अब्दुल्ला फयाज शेख आणि तल्हा खान अशी अटकेतील दहशतवाद्यांची नावे आहेत.
अब्दुल्ला फयाज शेख याला डायपरवाला म्हणूनही ओळखले जाते. तल्हा खानला इंडोनेशियातील जकार्ता येथील त्याच्या लपण्याच्या ठिकाणावरून परत येत असताना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 वर इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी पकडले. यानंतर एनआयएने त्याला ताब्यात घेतले. हे दोन्ही आरोपी दोन वर्षांहून अधिक काळापासून फरार होते. मुंबईतील एनआयए विशेष न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. प्रत्येक आरोपीला अटक करण्यासाठी एजन्सीने 3 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले होते.
दरम्यान, इसिसच्या पुणे स्लीपर सेलमधील या दोघांसह इतर आठ सदस्यांनी भारतात हिंसाचार पसरवून शांतता भंग करण्याचा आणि इस्लामिक राजवट स्थापन करण्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाले.
ताज हॉटेलला बॉम्बची धमकी
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. मुंबई एअरपोर्ट पोलिसांना हा धमकीचा ई-मेल आला. दहशतवादी अफजल गुरू आणि सैवक्कू शंकर याच्या फाशीचा बदला घेणारच असे या ईमेलमध्ये म्हटले आहे. या ई-मेलची मुंबईत पोलिसांनी तात्काळ दखल घेत तपासाला सुरुवात केली. या दोन्ही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवली असून, अद्याप काही संशयास्पद सापडले नाही.