पुणे : पुण्यात सायबर गुन्ह्यात प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळत असून, सायबर चोरट्यांनी दोन महिलांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याच्या आमिष दाखवत तब्बल ३० लाख ४६ हजारांना गंडा घातला आहे. याप्रकरणी, सहकारनगर आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रेडींगद्वारे त्यावर चांगला नफा
या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात धनकवडी येथील ३७ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानूसार, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. तक्रारदार महिलेला सायबर चोरट्यांनी व्हाटस्अपद्वारे संपर्क साधला. त्यांना शेअरमार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास ट्रेडींगद्वारे त्यावर चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर सायबर चोरट्यांवर विश्वास ठेवत ११ लाख ५५ हजार रूपये भरले. तेव्हा प्रथम त्यांचा विश्वास ठेवला व त्यांनी दिलेल्या पैसे भरले.
व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधून विविध प्रकारची आमिषे
दरम्यान, सायबर चोरट्यांनी नफा म्हणून ४ हजार ७५० रुपये खात्यावर परत दिले. मात्र, त्यानंतर मुद्दल रक्कम दिली न नफा. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पुढील तपास वरिष्ठ निरीक्षक माळाळे करीत आहेत. तर दुसर्या घटनेत नर्हे येथील एका ४७ वर्षीय महिलेला सायबर चोरट्यांनी अशाच प्रकारे १८ लाख ९५ हजारांचा गंडा घातला आहे. व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधून त्यांना विविध प्रकारची जादा परताव्याची प्रलोभने दाखविण्यात आली. त्यांना ग्रुपमध्ये अॅड करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी माहिती दिली.
विविध प्रकारचे फिर्यादींकडून फॉर्म भरून घेतल्यानंतर त्यांच्याकडून ऑनलाईन स्वरुपात 18 लाख 95 हजार रुपये भरून घेतले. फिर्यादींनी जेव्हा आरोपींकडे पैशांची मागणी केली तेव्हा त्यांना 3 टक्के रक्कम प्रॉफिटवर भरावी तरच पैसे मिळतील असे सांगितले. अन्यथा तुमचे बँक खाते फ्रिज होईल अशी भिती दाखवली. पुढील तपास पोलिस निरीक्षक क्षिरसागर करीत आहेत.
जेष्ठ महिलेच्या खात्यातून साडेतीन लाख काढले
मोबाईल नंबरशी लिंक असलेल्या बँक खात्यातून इंटरनेट बँकिगचा वापर करून सायबर चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या खात्यातून ३ लाख ५५ हजार रुपये परस्पर काढून घेतले. याप्रकरणी, जेष्ठ महिलेने सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
टास्क फ्रॉडद्वारे १२ लाखांची फसवणूक
पार्ट टाईम नोकरीचे प्रलोभन दाखवून टास्क फ्रॉडद्वारे सायबर ठगांनी व्यक्तीला ११ लाख ७८ हजार ७४९ रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी, कोंढवा पोलिसांनी सायबर ठगांवर फसवणूकीचा गुन्हा नोंद केला आहे. याबाबत उंड्री येथील ३९ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. टेलीग्रामच्या माध्यमातून सायबर ठगांनी तक्रारदारांशी संपर्क केला. टास्कच्या माध्यमातून नफा मिळेल असे सांगून पैसे गुंतवण्यास सांगितले. थोडी रक्कम गुंतविल्यानंतर त्याचा मोबदला क्रमांक दिला. त्यानंतर त्यांनी मोठी रक्कम ठगांच्या हवाली केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली.