जिल्हा बँकेच्या रणधुमाळीआधी उदयनराजेंचा ‘सहकाराचा मंत्र’; निवडणुकीतील समीकरणांवर चर्चेला उधाण
सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची चाहूल लागताच जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे असतानाच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सहकाराचा मुद्दा पुढे केला आहे. बँकेची निवडणूक पक्षीय राजकारणाच्या आखाड्यात न जाता शेतकरी आणि सभासदांच्या हिताचा विचार करून व्हावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या राजकीय समीकरणांबरोबरच ‘सहकार विरुद्ध राजकारण’ हा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.
जिल्हा बँकेचे नेतृत्व यापूर्वी अनेक दिग्गजांनी केले. मात्र, बँकेच्या कामकाजात राजकीय मतभेद बाजूला ठेवून संस्थेच्या हिताला प्राधान्य दिल्याचा दाखला उदयनराजेंनी दिला आहे. आर्थिक संस्थेच्या कारभारात राजकारणाचा अतिरेक झाल्यास त्याचा परिणाम संस्थेच्या कामकाजावर आणि विश्वासार्हतेवर होऊ शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली. बँकेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी, सभासद आणि खातेदारांना मोठ्या प्रमाणावर सेवा दिली जात आहे.
३१७ शाखा, ६७ एटीएम आणि ६५० मायक्रो एटीएमचे जाळे असल्याचे बँकेकडून सांगण्यात आले आहे. निव्वळ एनपीए सलग १९ वर्षे शून्य टक्के असून कर्जवसुली ९५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
निवडणूक जवळ येत असताना जिल्ह्यातील विविध राजकीय गटांकडून संभाव्य उमेदवार आणि मतदारसंघांची चाचपणी सुरू होण्याची शक्यता आहे. अशा वेळी उदयनराजेंनी मांडलेली भूमिका केवळ आवाहन न राहता निवडणुकीतील चर्चेचा प्रमुख विषय बनते का, याकडे लक्ष लागले आहे.
आवाहनाची कसोटी
‘राजकारणाचे जोडे बाहेर ठेवा’ या उदयनराजेंच्या भूमिकेला प्रमुख राजकीय नेते आणि सहकार क्षेत्रातील गट कसा प्रतिसाद देतात, हे आगामी काळात स्पष्ट होईल. बँकेचे हित, शेतकरीहित आणि राजकीय समीकरणे यामध्ये संतुलन साधण्याचे आव्हान आता इच्छुकांसमोर राहणार आहे.






