बारामती शहरात पावसाचा धुमाकूळ (फोटो- ai gemini)
बारामतीत अवकाळी पावसाचा कहर
आंबा, द्राक्ष व केळी पिकांचे मोठे नुकसान
राज्यभरात पावसाची हजेरी
बारामती: बारामती शहर व परिसरात बुधवारी (दि. १७) रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. बारामती शहरासह पिंपळी, काटेवाडी, भवानीनगर, सणसर आणि आसपासच्या अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढला होता.
दिवसभर उष्ण वातावरणानंतर सायंकाळी ६ नंतर आकाशात ढगांची दाटी वाढू लागली होती. वातावरणात गारवा निर्माण होत असतानाच रात्री पावणे नऊच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाची सुरुवात झाली. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने झाडांच्या फांद्या तुटण्याच्या घटना देखील घडल्या.
या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. विशेषतः आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी कच्चे आंबे गळून पडले. तसेच द्राक्ष आणि केळी या नगदी पिकांनाही या पावसाचा मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. द्राक्ष बागांमध्ये पावसाचा मारा झाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतेत असून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शासनाने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. हवामानातील या बदलामुळे पुढील काही दिवस अनिश्चिततेचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे.
Pune Rain Alert: सणाच्या दिवशी पण पाऊस! पुणे शहरात वरूणराजाने लावली हजेरी
पुणे शहरात वरूणराजाने लावली हजेरी
गेल्या काही दिवसांपासून राज्यात हवामानात सातत्याने बदल पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी देखील लागल्याचे दिसून आले. दरम्यान सगळीकडे गुढीपाडव्याचा उत्साह आहे. आजपासून नवीन वर्ष सुरू झाले आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच पुणे शहरात पावसा ने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेला पावसाचा अंदाज खरा ठरताना दिसून येत आहे.
अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान; पुणे-कोल्हापूर मार्गालाही तडाखा
पुणे शहरातील अनेक भागात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सिंहगड रस्ता परिसरात वडगाव, नांदेड सिटी परिसरात पावसाने हजेरी लावली. शहरात सकाळपासून ढगाळ आणि उन्हाळी वातावरण पाहायला मिळाले. मात्र अचानक दुपारी आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाल्याचे दिसून आले.गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरात पावसाने हजेरी लावल्याचे दिसून आले. अचानक आलेल्या पावसामुळे गुढीपाडव्याच्या कार्यक्रमांवर थोडासा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. पुणे शहराप्रमाणेच राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूरमध्ये देखील गारपीट आणि जोरदार पाऊस झाला आहे.






