
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत रिकामी करून रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. इमारत अतिधोकादायक अवस्थेत गेल्याने महापालिका प्रशासनाने गुरुवारी ती पाडून टाकली. विशेष म्हणजे, शालोम अपार्टमेंट आधीपासून धोकादायक घोषित केलेली नव्हती.
शेजारी सुरू असलेल्या पायलिंग आणि पाया खोदण्याच्या कामामुळे इमारतीला धोका निर्माण झाल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले आहे.
दरम्यान, सतत घडणाऱ्या या घटनांमुळे जुन्या इमारतींसोबतच नव्या बांधकामांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
शेजारील इमारतींना धोका निर्माण होणार नाही, यासाठी पायलिंग, खोदकाम आणि बांधकामाच्या कामांवर महापालिकेने कठोर देखरेख ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रभाग समिती ‘जी’चे प्रभारी सहायक आयुक्त निलेश म्हात्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शालोम इमारत पूर्वी धोकादायक नव्हती.
मात्र, शेजारी सुरू असलेल्या पायलिंगच्या कामामुळे इमारत खचली. कामादरम्यान निष्काळजीपणा झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘सेतू वन इन्फ्रा ‘ला नोटीस बजावून पुढील कार्यवाहीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
प्रभारी सहायक आयुक्त निलेश म्हात्रे यांनी या प्रकरणाबाबत स्पष्ट केलं की, ” 66 शालोम इमारत धोकादायक नव्हती. शेजारी सुरू असलेल्या पायलिंगच्या कामामुळे इमारत खचली. संबंधित विकासकाला नोटीस देऊन पुढील कार्यवाही सुरू आहे”.
वसई-विरारमध्ये इमारत दुर्घटनांचे सत्र सुरूच असून, महिनाभरातील ही चौथी घटना आहे. १७ जुलै रोजी नालासोपारा पूर्वेतील दुर्गेश्वरी अपार्टमेंटच्या ‘सी’ विंगला तडे जाऊन इमारत झुकली होती. १९ जुलै रोजी विरार पूर्वेतील हिराबाई अपार्टमेंटचा स्लॅब कोसळल्याने ६४ कुटुंबांचे स्थलांतर करावे लागले. तर ८ ऑगस्ट रोजी नालासोपाऱ्यात अवघ्या १५ वर्षे जुन्या रोशनी अपार्टमेंटचा सज्जा कोसळल्याने ५६ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवावे लागले.