व्हाइस अॅडमिरल अनिल जग्गी ‘एनडीए’ चे नवे कमांडंट
Pune News : व्हाइस अॅडमिरल अनिल जग्गी यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) नवे कमांडंट म्हणून पदभार स्वीकारला आहे. त्यांनी व्हाइस अॅडमिरल गुरचरण सिंग यांच्याकडून ही जबाबदारी स्वीकारली.
व्हाइस अॅडमिरल जग्गी हे भारतीय नौदल अकादमीचे माजी विद्यार्थी असून, १ जानेवारी १९९३ रोजी त्यांची भारतीय नौदलात नियुक्ती झाली. नेव्हिगेशन आणि डायरेक्शन तज्ञ असलेले व्हाइस अॅडमिरल जग्गी यांनी तीन दशकांहून अधिक काळ विविध ऑपरेशनल, स्टाफ, डिप्लोमॅटिक आणि इंस्ट्रक्शनल जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांनी क्षेपणास्त्र जहाज आयएनएस वीर आणि स्वदेशी शिवालिक श्रेणीतील स्टेल्थ गाईडेड मिसाइल फ्रिगेट आयएनएस सह्याद्रीचे नेतृत्व केले आहे.
व्हाइस अॅडमिरल जग्गी यांनी वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि गोवा येथील नेव्हल वॉर कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी लंडन येथील भारतीय उच्चायुक्तालयात नौदल सल्लागार म्हणून देखील काम केले आहे. यासोबतच, नवी दिल्ली येथील एनएचक्यूमध्ये कमोडोर (परदेशी सहकार्य) म्हणून काम करताना त्यांना आंतरराष्ट्रीय संबंधांचा अनुभव मिळाला आहे. एनडीएचे कमांडंट म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी, व्हाइस अॅडमिरल जग्गी यांनी महाराष्ट्र नौदल क्षेत्राचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग म्हणून जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्र राज्य आणि स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधून नागरी-लष्करी संपर्क उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.






