संग्रहित फोटो
सासवड/ संभाजी महामुनी : तब्बल १५ वर्षे झटूनही अद्याप अपेक्षित यश मिळाले नसल्याने कमालीचे अस्वस्थ असलेले आमदार विजय शिवतारे यावेळी प्रचंड ऍक्टिव्ह झाल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळेच यंदा निवडणूक झाल्यास नगरपालिका ताब्यात घेणारच असा निश्चय करून त्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून विकास कामांच्या निमित्ताने तब्बल अडीच ते तीन तास प्रशासनाची बैठक घेऊन विकासकामांचा आढावा घेतला आहे.
आमदार विजय शिवतारे यांनी सासवड परिषद निवडणुकीत वर्चस्व मिळविण्यासाठी माजी आमदार संजय जगताप यांच्याशी तब्बल १५ वर्षे लढत दिली. मात्र संजय जगताप यांची संस्थात्मक बांधणी मजबूत असल्याने शिवतारे यांना अल्पशा मतांवरच समाधान मानावे लागले आहे. त्यांनी आतापर्यंत चार वेळा विधानसभा निवडणूक लढवली तर त्यापैकी तीन वेळा मोठा विजय मिळविला आहे. परंतु सासवड आणि जेजुरी नगरपालिका ताब्यात घेण्यात अद्यापही यश आले नाही. त्यामुळे यावेळी नगरपालिका ताब्यात घेण्याचा त्यांनी चंग बांधला आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच त्यांनी सासवड नगरपालिका ताब्यात घेण्याचे जाहीर केले होते. त्यादृष्टीने त्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. नगरपालिका निवडणुका झाल्या नसल्याने गली तीन वर्षे प्रशासक कामकाज पाहत आहे. हीच संधी साधून आमदार शिवतारे यांनी या आठवड्यात सासवड नगरपालिकेत प्रवेश करून तब्बल अडीच, तीन तास प्रशासनाकडून आढावा घेतला. विशेष म्हणजे यापूर्वी त्यांनी नगरपालिकेत आमदार आणि मंत्री असतानाही एवढा वेळ दिला नव्हता. त्यामुळेच एवढा वेळ चाललेली बैठक म्हणजे निवडणुकीची पूर्व तयारीच म्हणावी लागेल.
मागील वर्षी अतिक्रमण विरोधी कारवाई करताना काही लोकांनी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांना जाहीररीत्या दम दिला होता, त्याचा अनुभव घेत यावेळी फ्लेक्स विरोधातील कारवाई करताना मुख्याधिकारी गैरहजर होते, मात्र त्यानंतर लगेचच शिवतारे यांनी बोलाविलेल्या बैठकीला हजर होते हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्यांच्यासोबतच शिवसेनेचे सर्व पदाधिकारीही बरोबर होते. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून आढावा घेताना अनेक अधिकाऱ्यांची फिरकी घेत उलट तपासणीही केल्याचे समजले.
पक्षातील भरतीला सुरुवात
मागील निवडणुकीत माजी नगरसेवक डॉ. राजेश दळवी यांना नगराध्यक्ष पदाने हुलकावणी दिली. तर डॉ. अस्मिता रणपिसे आणि सचिन भोंगळे हे दोन नगरसेवक निवडून आले. यावेळी शिवतारे यांनी संपूर्ण ताकद पणाला लावून पक्षप्रवेश मोहीम मोठ्या प्रमाणात आखली आहे. कॉंंग्रेसच्या विरोधात काम करणारे इतर पक्षातील चेहरे आपल्याकडे घेण्याचा तडाखा सुरु केला आहे. माजी उपनगराध्यक्ष दीपक टकले, सागर आबा जगताप, उद्योजक राजेंद्र टकले यांच्यासह काही नेत्यांना प्रवेश देवून कॉंंग्रेसवर कडी करण्याचा प्रयत्न केला आहे. यातूनच शिवतारे यांच्या आगामी वाटचालीचा अंदाज येत आहे.
वीर- सासवड पाईप लाईन योजनेकडे लक्ष.
विजय शिवतारे यांनी नुकतीच वीर वरून सासवडसाठी स्वतंत्र पाणी योजना मंजूर करून आणली आहे त्याच बरोबर नीरा नदीतून नाझरे धरणात पाणी सोडण्याचा प्रकल्प व इतर प्रकल्पाच्या माध्यमातून सासवडसह जेजुरीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे शिवतारे यांच्या पण योजनांना सासवड आणि जेजुरीकर कसा प्रतिसाद देतात याकडे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. वर्षानुवर्षे एकहाती सत्ता राखून वर्चस्व राखलेले माजी आमदार संजय जगताप आणि नगरपालिकेसाठी चंग बांधलेले आमदार विजय शिवतारे यांच्यातील वर्चस्ववादाची लढत नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने आगामी काळात पाहायला मिळणार हे नक्की.