फोटो - सोशल मीडिया
मुंबई : मालवणमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्देवी घटना घडली. यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चूक असल्याचा दावा विरोधकांनी केला. तर सदर पुतळा नौदलाकडून उभारण्यात आला होता असे सत्ताधाऱ्यांनी सांगितले. या सर्व प्रकरणावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे.
कंत्राट ठाण्यातील कंत्राटदाराला का दिले?
आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत रोष व्यक्त केला आहे. झालेली ही घटना दुर्दैवी असल्याचे देखील वडेट्टीवार म्हणाले आहेत. विजय वडेट्टीवार यांनी शिंदे गटाचे नेते व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची व्हिडिओ शेअर केली आहे. यावरुन रोष व्यक्त करत वडेट्टीवार यांनी लिहिले आहे की, ‘अपघाताने आलेल्या सरकारचं सगळं कामकाजच अपघाती आहे ! महाराष्ट्राच्या नशिबात हे महाविनाशी सरकार आले हाच महाराष्ट्रातील जनतेसाठी मोठा अपघात आहे. ज्यातून या राज्याला सावरायला खूप वेळ जाईल. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला, चोवीस तास होत आले, राज्य सरकारने चौकशी नेमली का? नौदल आणि राज्य सरकारने एकमेकांकडे बोट दाखवू नये, महाराष्ट्राचा जनतेला कळले पाहिजे की हे कंत्राट ठाण्यातील कंत्राटदाराला का दिले? कंत्राट देण्यासाठी काय प्रक्रिया राबवली?’ असे सवाल देखील विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.
अपघाताने आलेल्या सरकारचं सगळं कामकाजच अपघाती आहे!
महाराष्ट्राच्या नशिबात हे महाविनाशी सरकार आले हाच महाराष्ट्रातील जनतेसाठी मोठा अपघात आहे. ज्यातून या राज्याला सावरायला खूप वेळ जाईल.
बदलापूर प्रकरण अपघात होता.
समृध्दी महामार्गावर लोकांचे जीव गेले अपघात होता.
नांदेड मधील शासकीय… pic.twitter.com/Gz7vc0tMmW— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) August 27, 2024
जनतेचा रखवाला दाखवण्यासाठी तिघांची धडपड
पुढे त्यांनी लिहिले आहे की, ‘बदलापूर प्रकरण अपघात होता. समृध्दी महामार्गावर लोकांचे जीव गेले अपघात होता. नांदेडमधील शासकीय रुग्णालयात लोकं मेली अपघात होता. ठाणे शासकीय रुग्णालयात लहान बालके मेली तो अपघात होता. महाराष्ट्रभर ड्रग्सचा सुळसुळाट सुरू आहे तो एक अपघात आहे. ललित पाटील पळाला तो अपघात होता. रोज महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार होत आहे ते सुद्धा अपघाताने सुरू आहे. असे एक ना अनेक अपघात महाराष्ट्रात सुरू आहे. 3 ड्रायव्हर आणि एक स्टिअरिंग असल्यावर स्टिअरिंग हातात घेण्यासाठी मीच किती मोठा जनतेचा रखवाला हे दाखवण्यासाठी जी धडपड तिघांची सुरू आहे ना त्यामुळेच हे सगळे अपघात घडताय,’ अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी दीपक केसरकर यांच्यासह महायुतीच्या इतर नेत्यांना सुनावले आहे.